Muhammad Yunus Bangladesh : बांगलादेशात सत्तासंघर्षाची नांदी स्पष्टपणे दिसू लागली आहे. एकीकडे देशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस लष्करप्रमुखांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशच्या सैन्याने देशाच्या कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे युनूस यांची सत्ता डळमळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोहम्मद युनूस हे नोबेल पुरस्कार विजेते आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ असले तरी, सध्या ते राजकीय वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप होत आहेत. चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांशी त्यांनी संबंध दृढ करताच, त्यांच्या भूमिकेबाबत संशय वाढू लागला. अमेरिकेच्या गुप्त पाठिंब्याची चर्चा, युनूस यांच्यावरील आरोप अधिकच गंभीर करत आहेत.
लष्कराची कठोर भूमिका: ISPR ने दिला स्पष्ट इशारा
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) या बांगलादेश लष्कराच्या जनसंपर्क विभागाने नुकतेच एक ठळक निवेदन जारी करून म्हटले की, “त्रासदायक, सार्वजनिक हिताच्या विरुद्ध असलेली किंवा सशस्त्र दलाची प्रतिमा खराब करणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही.” ही भाषा अत्यंत स्पष्ट असून, युनूस सरकारला उद्देशून दिलेला अप्रत्यक्ष इशाराच मानला जात आहे. बांगलादेश लष्कराने आता देशातील कायदा-सुव्यवस्था हातात घेण्याचा इशारा दिला आहे, जो युनूससाठी अत्यंत गंभीर मानला जात आहे.
लष्करप्रमुखांचा अमेरिका दौरा, आंतरराष्ट्रीय संकेत?
बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाच दिवसांचा अमेरिका दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकन सुरक्षा संस्थांशी बैठक घेतली, आणि सामरिक सहकार्याबाबत चर्चा केली. ही भेट केवळ औपचारिक नसून, लष्कराची स्वायत्त रणनीती आणि ताकद वाढवण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिली जात आहे. याच दरम्यान युनूस देशांतर्गत राजकीय पकड मजबूत करण्यात व्यस्त असताना, लष्कर आपल्या पातळीवर स्वतंत्रपणे हालचाली करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जो बायडेन गंभीर आजाराने त्रस्त; मोठमोठ्या नेत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
निवडणुकांची अनिश्चितता, जनतेतील अस्वस्थता वाढतेय
शेख हसीनाच्या सत्तानंतर, युनूस सत्तेवर आले असले तरी, सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत त्यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही. निवडणुका जाहीर केल्या गेल्या असल्या तरी, त्यांची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही, त्यामुळे देशात लोकशाही प्रक्रियेबाबत असंतोष वाढू लागला आहे. हीच संधी ओळखून लष्कर परिस्थितीचा ताबा घेण्याच्या दिशेने झुकत असल्याचे संकेत मिळत आहेत. सत्तेतील रिकामपणा आणि प्रशासनातील गोंधळामुळे देशात पुन्हा एकदा सत्तापालटाची शक्यता जनतेमध्ये चर्चेत आहे.
राजकीय चित्र बदलण्याच्या वाटेवर?
वास्तविक पाहता, बांगलादेशात लष्कराची एक ऐतिहासिक परंपरा आहे. राजकीय हस्तक्षेपाची आणि गरज पडल्यास सत्तेचा ताबा घेण्याची. युनूस यांच्या कारभारावर विश्वास न राहिल्यास, सैन्य कोणतीही भूमिका घेण्यास मागे हटणार नाही, अशीच सध्याची परिस्थिती दर्शवते. देशातील नागरिकांमध्येही युनूस यांच्याविषयी नाराजी आहे. त्यांनी देशाच्या हिताऐवजी, स्वतःच्या राजकीय इच्छाशक्तीला प्राधान्य दिल्याचा आरोप वाढतो आहे. दुसरीकडे, लष्कर सक्षम, नियोजित आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींशी सहकार्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘operation sindoor’ नंतर प्रथमच विदेश दौऱ्यावर जाणार परराष्ट्र मंत्री जयशंकर; ‘या’ 3 देशांसोबत मिटिंग
युनूस यांच्या सत्तेवर प्रश्नचिन्ह?
बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता, मोहम्मद युनूस यांची सत्ता धोक्यात आल्याचे स्पष्ट दिसते. लष्कराने घेतलेली आक्रमक भूमिका, लष्करप्रमुखांचा अमेरिका दौरा, आणि निवडणुकांबाबतची अनिश्चितता या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे राजकीय स्फोटकता वाढली आहे. पुढील काही आठवडे बांगलादेशसाठी निर्णायक ठरणार आहेत. लोकशाही मार्गाने सत्ता हस्तांतरण होईल, की पुन्हा एकदा लष्करी हस्तक्षेपातून देशाला नवा राजकीय मार्ग मिळेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.