Lashkar-e-Taiba funeral : पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना मिळणाऱ्या खुले पाठिंब्याचा आणखी एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. लष्कर-ए-तोयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा कमांडर गाझी अबू सैफुल्ला उर्फ रजाउल्ला निजामानी याचा अंत्यसंस्कार पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील माटली येथे करण्यात आला. या अंत्ययात्रेत अमेरिका आणि भारताने ‘वॉन्टेड दहशतवादी’ म्हणून घोषित केलेल्या फैसल नदीम याची उपस्थिती, तसेच बंदुका, एके-४७ सारख्या अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या लष्करच्या दहशतवाद्यांनी केलेली सुरक्षा व्यवस्था, हे स्पष्टपणे दाखवते की पाकिस्तानच्या भूमीवर अजूनही दहशतवादाला खुलेआम शरण दिले जात आहे.
माटलीमध्ये अंत्ययात्रा, पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळलेले पार्थिव
१८ मे २०२५ रोजी रात्री, गाझी अबू सैफुल्ला याची अंत्ययात्रा माटली येथे काढण्यात आली. नमाज-ए-जनाजा दरम्यान त्याचे पार्थिव पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये गुंडाळण्यात आले होते, हे देखील दहशतवाद्यांना राष्ट्रपुरुषांप्रमाणे गौरव देण्याचे उदाहरण आहे. या अंत्यसंस्कारात उपस्थित फैसल नदीम हा देखील लष्करचा कमांडर असून तो भारतात अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. त्याला अमेरिकेनेही मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट म्हणून घोषित केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘operation sindoor’ नंतर प्रथमच विदेश दौऱ्यावर जाणार परराष्ट्र मंत्री जयशंकर; ‘या’ 3 देशांसोबत मिटिंग
अबू सैफुल्ला, नेपाळवरून भारतात हल्ल्यांचे जाळे
मारला गेलेला दहशतवादी गाझी अबू सैफुल्ला उर्फ मोहम्मद सलीम उर्फ रजाउल्ला निजामानी, हा नेपाळमार्गे लष्करच्या दहशतवाद्यांचे भारतात पाठवणीचे मोठे नेटवर्क चालवत होता. भारतात घडलेल्या किमान तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा थेट सहभाग होता. विशेष म्हणजे, २००६ मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटामध्येही सैफुल्ला सहभागी होता. याशिवाय, त्याने नेपाळमध्ये लष्करच्या तळांची उभारणी केली होती आणि भारताविरुद्ध सतत षड्यंत्र रचत होता.
दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शस्त्रधारी सुरक्षा?
एबीपी न्यूजकडे असलेल्या व्हिडिओ व छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसते की अंत्ययात्रेत लष्करचे दहशतवादी बंदुका व एके-४७सह उपस्थित होते. यामुळे असा सवाल उपस्थित होतो की, दहशतवादीच आता पाकिस्तानात अधिकृत सुरक्षारक्षकांची भूमिका बजावत आहेत का? फैसल नदीमसारख्या वॉन्टेड दहशतवाद्याला इतक्या खुलेपणाने अंत्यसंस्कारात उपस्थित राहण्याची मुभा देणे, हे पाकिस्तानच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद्यांचा गौरव?
या घटनेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या दहशतवादास पाठिंबा देणाऱ्या धोरणांचा भंडाफोड केला आहे. भारत, अमेरिका व इतर अनेक देश सातत्याने पाकिस्तानवर आरोप करत आले आहेत की, ते दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देतो आणि त्यांच्या कारवायांना समर्थन देतो. या घटनेने पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी संघर्षाच्या कथित दाव्यांचा पोकळपणा जगासमोर उघड केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जो बायडेन गंभीर आजाराने त्रस्त; मोठमोठ्या नेत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
पाकिस्तानचा ‘डबल गेम’ पुन्हा समोर
गाझी अबू सैफुल्ला याच्या अंत्यसंस्काराने हे पुन्हा सिद्ध झाले की पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना देशभक्त ठरवतो आणि त्यांना संरक्षण व गौरव देतो. फैसल नदीमसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर हल्लेखोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहशतवाद्याची उपस्थिती आणि शस्त्रधारी सुरक्षेच्या छायेत पार पडलेली अंत्ययात्रा हे पाकिस्तानच्या ‘डबल गेम’चे जिवंत उदाहरण आहे. ही घटना केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जागतिक समुदायासाठी गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची सखोल चौकशी आणि पाकिस्तानवर दबाव आणण्याची गरज आहे.