Pakistan Shehbaz Shrif send special message to Russia's President Putin
मॉस्को: ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आपले शिष्टमंडळ पाठवून पाकिस्तानचा जगभरात पर्दाफाश केला आहे. पाकिस्तानचा खोटारडेपणा पूर्ण जगासमोर उघड झाला आहे. याच वेळी पाकिस्तानने देखील भारताचे अनुकरण केले आहे. पाकिस्तानचे शिष्टमंडळ देखील सध्या विदेश दौऱ्यावर असून जगभरातील देशांना भारविरुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. याच वेळी पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने रशियालाही भेट दिली आहे.
पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने मॉस्कोमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतली आहे. या दरम्यान पाकिस्तानने दक्षिण आशियातील परिस्थितीची माहिती लावरोव्ह यांना यांना दिली. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुतिन यांना उद्देशून एक वैयक्तिक पत्र देखील लिहिले आहे. रशियाला खूश करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने सुरु केला आहे.
रशिया गेल्या अनेक काळापासून भारताचा मोठा मित्र आहे. दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ आहेत. तसेच पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची मैत्री देखील अधिक बळकट आहे. अशातच पाकिस्तान रशियाला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. शाहबाज यांनी पत्रात नेमके काय लिहिले आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण पाकिसतानी शिष्टमंडळवर भारताची बारीक नजर आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावानंतर भारताच्या मित्र देशासोबत रशियासोबत धोरमात्मक संबंध वाढवण्याचा शाहबाज प्रयत्न करत आहेत. रशियन राज्य एजन्सी TAAS ने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान शाहबाज यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना खास पत्र दिले आहे.
पाकिस्तान शिष्टमंडळ रशियात पोहोचण्याच्या काही दिवस आधीच भारताच्या शिष्टमंडळाने मॉस्कोत पाकिस्तान आणि त्याच्या सीमापार दहशतवादाचा पर्दाफाश केला आहे. तसेच रशियाने भारत आणि पाकिस्तानमध्ये परस्पर विश्वास वाढविण्यासाठी दोन्ही देशांना थेट संवादाचे आवाहन केले आहे.
पाकिस्तानने केवळ रशियाचे नव्हे तर मलेशियाला देखील आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने मलेशियातील भारताच्या शिष्टमंडळाचे कार्यक्रम रद्द करवण्याचा प्रयत्न केला होता. पण पाकिस्तानला मलेशियाने जोरदार झटका देत, त्यांचा कोणताही हस्तक्षेप स्वीकारला नाही. सध्या चीन, तुर्की, अझरबैजान, ताजिकिस्तान पाकिस्तानच्या बाजूने आहेत.
भारताच्या शिष्टमंडळाने जागतिक स्तरावर पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि मलेशिया, ब्राझील, रशिया या देशांमध्ये भारताच्या शिष्टमंडळाचा दौरा पार पडला आहे. या शिष्टमंडळाचा उद्देश दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची भूमिकेचा, खोटारडेपणाचा खुलासा करणे आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरची जगाला माहिती देणे आहे. भारताने संपूर्ण जगाला स्पष्ट संदेश दिला आहे की, भारत कायम दहशतवादविरोधी एकजूट होऊन उभा आहे.