Pakistani fans cheer Virat Kohli Zindabad praising Indian players Video gone viral
इस्लामाबाद – आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव करत उपांत्य फेरीकडे मजबूत पाऊल टाकले. या पराभवानंतर पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आपल्या संघाच्या सुमार कामगिरीवर टीका करत असतानाच, भारतीय संघ आणि विशेषतः विराट कोहलीच्या फलंदाजीचे भरभरून कौतुक करण्यात आले. कोहलीच्या शतकानंतर पाकिस्तानमध्ये ‘विराट कोहली झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या, ही घटना क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.
पाकिस्तानी चाहत्यांमध्ये विराटसाठी प्रेम, संघावर तीव्र नाराजी
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर चाहत्यांचा रोष वाढला. सोशल मीडियावर आणि मैदानाबाहेर चाहत्यांनी पाकिस्तानी खेळाडूंवर कडवट टीका केली. सामना संपल्यानंतर पाकिस्तानी महिला यूट्यूबर नायला खानने चाहत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यावेळी एका चाहत्याने सांगितले की, “संघाच्या कामगिरीमुळे मी निराश आहे, पण विराट कोहलीच्या फलंदाजीने माझे मन जिंकले. त्याने ज्या शैलीत खेळून भारतीय संघाला विजय मिळवून दिला, त्याला तोड नाही.” या वक्तव्यानंतर उपस्थित चाहत्यांनी विराटच्या नावाचा जयघोष केला. ‘विराट कोहली झिंदाबाद’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. विराट कोहली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करतो. त्यामुळे त्याला ‘किंग कोहली’ म्हणून संबोधले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; इस्लामिक स्टेटने आखली अपहरणाची योजना
“पाकिस्तानी खेळाडूंना बांगड्या भेट द्या” – चाहत्यांची नाराजी
पाकिस्तान संघाच्या निराशाजनक कामगिरीबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने उपरोधिक वक्तव्य केले, “मी पाकिस्तान संघातील प्रत्येक खेळाडूला एक बांगडी भेट देऊ इच्छितो!” हे वक्तव्य पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या अपयशाकडे बोट दाखवणारे होते. एका चाहत्याने सांगितले की, “भारत मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच सिंहासारखा खेळतो. त्यांचे खेळाडू मैदानात १०० टक्के योगदान देतात. विशेषतः विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध नेहमीच सर्वोत्तम खेळ करतो. त्यामुळे आजही त्याने ज्या प्रकारे भारतीय संघाला विजय मिळवून दिला, ते आश्चर्यकारक होते.”
credit : social media, Youtube
भारताची विजयी घोडदौड, पाकिस्तान स्पर्धेबाहेर जाण्याच्या मार्गावर
या शानदार विजयामुळे भारताने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या गळ्यात स्पर्धेबाहेर होण्याचे संकट आले आहे. पाकिस्तानचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध होणार असला तरी, स्पर्धेतील त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानने तब्बल २९ वर्षांनंतर आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र, घरच्या मैदानावरही त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. सलग दोन पराभवांमुळे पाकिस्तान हा स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर असलेला पहिला संघ ठरण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानचा घाणेरडा खेळ सुरू! चिकन नेकजवळ मिळाले रहस्यमई सिग्नल, ISIचा पर्दाफाश
भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला
या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील फलंदाजी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे संघाने पाकिस्तानला सहज नमवले. या घटनेनंतर क्रिकेटप्रेमींमध्ये विराट कोहलीच्या फलंदाजीवर चर्चा सुरू झाली असून, पाकिस्तानमधील चाहत्यांनीही कोहलीच्या कसबाला दाद दिली आहे. या विजयामुळे भारताचे विजेतेपदाचे स्वप्न आणखी मजबूत झाले आहे, तर पाकिस्तानसाठी ही स्पर्धा लाजिरवाणी ठरली आहे.