पाकिस्तानचा घाणेरडा खेळ सुरू! चिकन नेकजवळ मिळाले रहस्यमई सिग्नल, ISIचा पर्दाफाश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : भारत-बांगलादेश सीमेवर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआय च्या कारवाया वाढत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. चिकन नेक कॉरिडॉरजवळ संशयास्पद रेडिओ सिग्नल पकडण्यात आले असून, त्यामध्ये अरबी, उर्दू आणि बंगाली भाषांतील संभाषण आढळले आहे. या सिग्नलच्या डीकोडिंगनंतर आयएसआय बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
चिकन नेकजवळ सुरक्षा धोक्यात!
भारताच्या चिकन नेक कॉरिडॉरजवळ आयएसआयची सक्रियता ही देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे. हा कॉरिडॉर ईशान्य भारताला मुख्य भूमीशी जोडणारा एकमेव मार्ग आहे, जो लष्करी दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जातो. द ट्रिब्यूनच्या अहवालानुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा बांगलादेशातील काही कट्टरवादी गटांच्या मदतीने रोहिंग्या समुदायाला भारताविरोधात कट रचण्यासाठी प्रशिक्षण देत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video: खाली हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाहची अंत्ययात्रा, वर इस्त्रायली फायटर जेटची सिंहगर्जना
सीमेजवळ पकडले गेले रहस्यमय सिग्नल
गुप्तचर यंत्रणांना शोनपूर, बसीरहाट, बोनगाव आणि दक्षिण 24 परगणा येथे हे संशयास्पद सिग्नल आढळले. हे संदेश रात्री उशिरा (पहाटे १ ते ३ वाजेच्या दरम्यान) बांगलादेशातील विविध ठिकाणांहून पाठवले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. संवादाचे स्वरूप पाहता, ही सगळी योजना मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. बांगलादेशातील कट्टरवाद्यांच्या सहकार्याने आयएसआय रोहिंग्या निर्वासितांना दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षित करत आहे, ही माहिती उघड झाल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. भविष्यात याचा थेट धोका पश्चिम बंगालसह ईशान्य भारतातील राज्यांना निर्माण होऊ शकतो.
बांगलादेशातील सत्तापालट आणि पाकिस्तानचा वाढता प्रभाव
बांगलादेशात २०२४ मध्ये मोठ्या विरोधानंतर सत्तापालट झाला. या सत्तांतरानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. मोहम्मद युनूस यांचा पाकिस्तानबाबतचा दृष्टिकोन सौम्य असल्यामुळे बांगलादेश आणि भारताचे संबंध आधीपेक्षा बिघडले आहेत. पाकिस्तान या परिस्थितीचा पूर्णपणे फायदा घेत आहे. बांगलादेशातील नवीन सरकारची भारतविरोधी भूमिका आणि पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या कारवाया भारताच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत आहेत.
पाकिस्तानच्या उच्च अधिकाऱ्यांनी घेतली सीमावर्ती भागांची पाहणी
अहवालानुसार, पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी रंगपूर, चटगाव आणि कॉक्स बाजार या भारत-बांगलादेश सीमेवरील महत्त्वाच्या ठिकाणी गुप्त भेटी दिल्या. या भागात पाकिस्तानचा प्रभाव वाढत असून, भारताविरोधात कट रचला जात असल्याचा संशय आहे.
भारताच्या सुरक्षेसमोरील नवे आव्हान
भारतासाठी ही परिस्थिती गंभीर बनत आहे. चिकन नेक कॉरिडॉर हा भारताच्या ईशान्य भागाशी जोडलेला एकमेव मार्ग असल्याने, तो सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर या भागात अस्थिरता निर्माण झाली, तर ईशान्य भारताचे इतर भागांशी संपर्क तुटण्याचा धोका आहे. त्यामुळे भारताला या भागात सुरक्षा व्यवस्थेत अधिक कडक पावले उचलावी लागणार आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारताच्या विरोधात वापरले तर…’, अमेरिकेची पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांवर करडी नजर
भारताविरोधात मोठे षडयंत्र
पाकिस्तानची आयएसआय बांगलादेशातून भारताविरोधात मोठे षडयंत्र रचत आहे, हे स्पष्ट झाले आहे. बांगलादेशातील सत्तांतर, पाकिस्तानचा वाढता प्रभाव आणि भारतविरोधी कटकारस्थान ही सर्व बाबी एकत्रितपणे मोठा धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सीमेवरील गस्त वाढवून, या कटांवर वेळेत कारवाई करणे आवश्यक आहे.