फोटो सौजन्य सोशल मीडिया
पोप लिओ चौदावे यांचे मूळ नाव रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट आहे. त्यांचा जन्म अमेरिकेतील शिकागो येथे झाला. २०२५ मध्ये पोपपदी निवड झाल्यानंतर ते व्हॅटिकनमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व सोडलेले नाही. त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा त्यांचा अधिकार कायम आहे.
पोप लिओ यांची अमेरिकेतील इलिनॉय राज्याच्या विल काउंटीमध्ये मतदार म्हणून नोंदणी आहे. त्यांनी आगामी मध्यावधी निवडणुकीसाठी ३ ऑक्टोबर रोजी टपालाद्वारे मतदान करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी आपले मत नोंदवून मतपत्रिका शिकागो येथे पाठवली. व्हॅटिकनच्या प्रेस कार्यालयाने ३० ऑक्टोबर रोजी त्यांच्या मतदानाला अधिकृत दुजोरा दिला.
पोप लिओ चौदावे यांनी नागरिकांच्या लोकशाही प्रक्रियेतील सहभागाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. मतदान करणे हा प्रत्येक पात्र नागरिकाचा अधिकार असून, लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे हे त्याचे कर्तव्यही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पेरूमध्ये वास्तव्यास असतानाही पात्र असलेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी मतदानाचा अधिकार बजावल्याचे व्हॅटिकनने सांगितले.
अमेरिकेत ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यावधी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागांसाठी, तर सिनेटच्या ३५ जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय ३६ राज्यांमध्ये गव्हर्नरपदाच्या निवडणुकाही होणार आहेत. अशा महत्त्वाच्या निवडणुकीत पोप लिओ चौदावे यांनी मतदानाचा अधिकार बजावल्याने त्यांच्या सहभागाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.






