Russia is a serious threat to Europe NATO needs long-range missiles says U.S. general
NATO long-range missiles : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी युरोपवर रशियाच्या संभाव्य हल्ल्याबाबत मोठा इशारा दिला आहे. अमेरिकन आर्मीचे मेजर जनरल जॉन रॅफर्टी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, जर युरोपला सुरक्षित राहायचे असेल तर नाटोला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची तातडीने गरज आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रशिया फक्त युक्रेनपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो आपल्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांद्वारे युरोपलाही लक्ष्य करू शकतो. त्यामुळे युरोपियन देशांनी आपल्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
रॅफर्टी यांनी जर्मनीत दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “युद्ध सुरू झाल्यापासून आज रशियन सैन्य अधिक मजबूत झालं आहे. त्यांनी लांब पल्ल्याच्या रॉकेट्स, क्षेपणास्त्रं आणि अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालींमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.” त्यांनी युक्रेनवरील रशियाच्या अचूक आणि दूरवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमुळे नाटोला सतर्क राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. युक्रेनमध्ये रशियाने महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, वीज प्रकल्प, सैनिकी केंद्रांवर टार्गेटेड हल्ले केले आहेत हे दर्शवतं की या शस्त्रांची ताकद किती घातक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 300 वर्षांपूर्वी गोव्यातून निघालेलं पोर्तुगीज जहाज समुद्रात बुडालं; आता सापडला 12 अब्ज रुपयांचा खजिना
युक्रेनमधील संघर्षाने हे अधोरेखित केले आहे की युरोप लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांबाबत अमेरिकेवर फारच अवलंबून आहे. त्यामुळे नाटो आणि युरोपियन देशांनी आपल्या स्वतःच्या उत्पादन क्षमतेत वाढ करून अमेरिकेवरील ही निर्भरता कमी केली पाहिजे, असंही जनरल रॅफर्टी यांचे म्हणणे आहे. त्यांनी युरोपला स्पष्ट इशारा दिला की, “युतीने (नाटो) आता लवकर निर्णय घ्यावा लागेल. क्षमता वाढवावी लागेल. अन्यथा रशिया भविष्यात आणखी आक्रमक धोरण राबवेल.”
गेल्या काही महिन्यांत क्रेमलिनने युक्रेनवरच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ केली आहे. यामध्ये रशियाने आपल्या लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा परिणामकारक वापर केला आहे. परिणामी युक्रेनमध्ये हजारो लोक विस्थापित झाले, तर महत्त्वाच्या संसाधनांची नासधूस झाली. रशियाच्या या धोरणामुळे युरोपमधील अस्थिरता वाढली असून, हा धोका केवळ युक्रेनपुरता मर्यादित न राहता, शेजारील नाटो देशांवरही घसरू शकतो, असा धोका अमेरिकन जनरलने व्यक्त केला आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील शांतता करारावर होणाऱ्या चर्चांनी निराशाजनक वळण घेतले आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असला तरी रशियाच्या आक्रमकतेमुळे या प्रयत्नांना यश आलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील यावर प्रतिक्रिया देताना पुतिन यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी नाटोमार्फत युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली देण्याचे आश्वासन दिले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तुर्कीची S-400 पाकिस्तानला विकण्याची योजना; काय असणार अमेरिका आणि इस्रायलची भूमिका?
संपूर्ण युरोपसाठी ही एक इशारा देणारी वेळ आहे. रशियाची युद्धनीती आणि त्यांची लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची क्षमता पाहता, नाटोला केवळ प्रतिक्रियावादी नव्हे तर आधुनिकीकरण आणि तांत्रिक सामर्थ्याने सुसज्ज असलेली भूमिका घ्यावी लागेल. जर नाटोने वेळेत पावले उचलली नाहीत, तर रशियाची वाढती ताकद संपूर्ण युरोपसाठी धोकादायक ठरू शकते ही बाब आता नाकारता येणार नाही.