Russia resident Vladimir Putin offers direct talks to Ukraine on Ceasefire
मॉस्को: सध्या जगात तीन अघाड्यांवर संघर्ष सुरु आहे. एकीकडे इस्रायल-हमास, दुसरीकडे रशिया-युक्रेन आणि तिसरीकडे भारत आणि पाकिस्तान मध्ये तणावापूर्ण वातावरण आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी कराराची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना युद्धबंदीसाठी थेट चर्चेची ऑफर दिली आहे. यामुळे रशियाचे हे पाऊल सकारत्मकतेच्या दिशेने महत्त्वाचे मानले जात आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये थेट चर्चा करण्याचा प्रस्ताव युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली आहे. पुतिन यांनी म्हटले आहे की, या चर्चेचा उद्देश कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करणे आणि युद्धाचे मूळ कारणांवार तोडगा काढणे आहे. यामुळे दीर्घकालीन सुरु असलेल्या या युद्धाचा शेवट करण्यासाठी पुतिन यांनी थेट युक्रेनशी इस्तंबूलमध्ये चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे.
दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यापूर्वी झालेल्या चर्चा अयशस्वी ठरण्याला युक्रेनला जबाबदार धरले आहे. २०२२ मध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर ही चर्चा झाली होती. ही चर्चा अपयशी ठरण्यामागचे कारण रशिया नव्हे युक्रेन होते, असे पुतिन यांनी म्हटले आहे.परंतु रशिया कीवला कोणत्याही अटींशिवाय, वाटाघाटींंशिवाय चर्चा सुरु करण्याचा प्रस्ताव देत आहे हे पुतिन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान पुतिन यांनी म्हटले की, आम्ही युक्रेनला इस्तंबूलमध्ये गुरुवारी (१५ मे) थेट चर्चेचा प्रस्ताव देतो. आमचा प्रस्ताव युक्रेनच्या अटींवर आधारित आहे. आता फक्त युक्रेनियन अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या क्युरेटर्सना निर्णय घेयचा आहे.
याच दरम्यान युरोपियन नेत्यांनी ३० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव शनिवारी (१० मे) सादर केला होता. याला डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर युरोपियन नेत्यांनी पुतिन यांना इशारा दिला होता. युरोपियन नेत्यांनी पुतिन यांना प्रस्ताव न स्वीकराल्यास नवीन निर्बंधांची धमकी देण्यात आली होती.
गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. दरम्यान हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. यापूर्वीही ३० दिवसांच्या युद्धबंदीला रशियाने मान्यता दिली होती. परंतु त्याच्या एक दिवसानंतर लगेच युक्रेनवर हल्ला करत युद्धबंदी भंग करण्यात आली होती. दरम्यान आता इस्तंबूलमध्ये चर्चा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अद्याप युक्रेनकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.