Saudi Arabian officials denies lifting Ban alcohol ban
रियाध: एक मोठी बातमी समोर येत आहे. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी दारुवरील बंदी उठवण्याच्या वृत्तांचे खंडन केले आहे. काही दिवसांपासून सौदी अरेबिया दारुवरील बंदी उठवण्याच्या चर्चा सुरु होत्या. पण सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सौदी अरेबियाने दारुबाबतच्या धोरणात कोणताही बदल केलेला नाही. सौदी अरेबियाने ७३ वर्षानंतर दारुवरील बंदी उठवत असल्याचे पहिले वृत्त वाइन ब्लॉगवर कोणत्याही स्त्रोताशिवाय देण्यात आले होते. यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय माध्यामांनी याचे वृत्तांकन केले.
यामध्ये सांगण्यात येत होते की,सौदी अरेबिया २०३४च्या फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करत आहे, यासाठी दारुवरील बंदी उठवण्यात आली आहे. अहवालात असेही सांगण्यात आले होते की, सौदी अरेबियाने काही विशिष्ट क्षेत्रांमध्येच दारुच्या विक्रीची परवानगी दिली आहे. यामध्ये लक्झरी हॉटेल्स, रिसॉर्ट आणि पर्यटकांना सेवा देणार्या स्थळांचा समावेश होता. तसेच सौदी अरेबियाचे नवीन शहर निओम, सिंदाला आणि रेड सी प्रोजेक्ट अशी काही ठिकाणे दारु विक्रीची परवानगी असल्याचे म्हटले होते. मीडिया रिपोर्टमध्ये सौदी अरेबियाने फक्त बिअर वाईन आणि सायडर सारखे अल्कोहोलिक पेये विकण्यास परवानगी दिल्याचेही सांगण्यात आले होते.
मात्र, सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्लामिक देश सौदी अरेबियात इस्लामची दोन सर्वात पवित्र शहरे मक्का आणि मदिना आहे. तसेच इस्लाममध्ये दारु विक्री आणि त्याच्या सेवनाबाबत कडक कायदे आहेत. राज्याचे शासक मोहम्मद बिन सलमान यांनी दारुच्या विक्रीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यांनी केवळ परदेशी पर्यटक आणि गुंतवणून आकर्षित करण्यासाठी देशाच्या रुढीवादू इस्लामिक प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. पण दारुवरील बंदी उठवण्यात आलेली नाही. क्राऊन प्रिन्स यांनी व्हिजन २०३० अंतर्गत देशाच्या तेल-आधारित अर्थव्यवस्थेत सुधारणा केली आहे. यामध्ये सिनेमा आणि संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यासारख्या बाबींचा समावेश आहे. तसेच सौदी अरेबियात क्रीडा स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. हा देखील व्हिजन २०३० चा एक प्रकल्प आहे. यासर्व गोष्टींमध्ये बदल केला जाणार आहे. मात्र दारुवरील बंदी कायम राहील असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.