Scientists warn of millions of deaths due to upcoming major earthquake in Istanbul
सोमवारी सकाळी दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये पहाटे 5.37 वाजता भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रता इतकी 4.0 होती आणि केंद्र दिल्लीच्या पाच किलोमीटर खोलीवर होते. कमी खोलीमुळे झटके अधिक तीव्र जाणवले. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर वैज्ञानिकांनी इस्तांबुलमध्ये मोठ्या भूकंपाचा इशारा दिला आहे, यामुळे लाखो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत ग्रीसच्या सेंटोरिनी बेटाजवळील भागात जवळपास 8,000 लहान-मोठ्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे या भागांमध्ये आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली आहे. सेंटोरिनी हा ग्रीसचा एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून या भागातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसलेले आहे. वैज्ञानिकांनी इतर भूकंपप्रवण भागांचे निरीक्षण करताना इस्तांबुलच्या मोठ्या भूकंपाविषयी भीषण भाकीत केले आहे.
इस्तांबुलमध्ये 250 वर्षींनी मोठा भूकंप
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जियोसाइंसेजचे वैज्ञानिक मार्को बोहनहोफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्तांबुलमध्ये साधारणपणे प्रत्येक 250 वर्षांनी मोठा भूकंप येतो. 1766 साली शेवटचा महाभयंकर भूकंप आला होता, यामुळे या भागात मोठ्या भूकंपाची वेळ आता पार झाली आहे. बोहनहोफ यांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दशकांमध्ये मोठा भूकंप होण्याची 80% शक्यता आहे.
मोठी जीवितहानी होण्याची शक्यता
भूकंपतज्ज्ञ नासी गोरूर यांनी देखील इस्तांबुलच्या परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, 10 हजार इमारती मोठ्या भूकंपात कोसळण्याचा धोका आहे आणि लाखो लोकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. गोरूर यांनी इशारा दिला की स्थानिक सरकार आणि नागरिक दोघेही या संभाव्य आपत्तीच्या गंभीरतेला गांभीर्याने घेत पाहिजे.
इस्तांबुलच्या पायाभूत सुविधा कमकुवत
याशिवाय, इस्तांबुल मोठ्या भूकंपासाठी अजिबात तयार नसल्याचे यिल्डिज टेक्निकल यूनिव्हर्सिटीचे भूविज्ञान प्राध्यपक सुकरु एर्सय यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, या शहराची घनदाट लोकसंख्या आणि असुरक्षित पायाभूत सुविधा यामुळे होणारे नुकसान टाळणे कठीण होणार आहे.
तुर्कीचे शहरी विकास मंत्री मूरत कुरुम यांनीही इस्तांबुलच्या पायाभूत सुविधांमध्ये भूकंप सहन करण्याची क्षमता कमी असल्याचे मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर इस्तांबुलच्या संभाव्य महाभूकंपाची भीती अधिक गंभीर बनली आहे. वैज्ञानिकांनी भूकंपाच्या धोक्याची जाणीव ठेवून आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्याचा सल्ला दिला आहे.