Shahbaz Sharif India-Pakistan ties hinge on Kashmir Kashmiri blood won’t be wasted
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा भारताविरुद्ध विष ओकले आणि काश्मीर मुद्दा जागतिक स्तरावर उचलण्याचा प्रयत्न सुरू केला.
ते २६ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) भाषण करणार असून त्यात काश्मीर आणि पॅलेस्टाईन प्रश्न मांडण्याची शक्यता आहे.
लंडनमध्ये प्रवासी पाकिस्तानी नागरिकांशी बोलताना त्यांनी म्हटले की “काश्मिरींचे रक्त व्यर्थ जाणार नाही” आणि भारत-पाकिस्तान संबंध काश्मीरशिवाय सामान्य होऊ शकत नाहीत.
Shahbaz Sharif Kashmir stance : भारत-पाकिस्तान संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान सतत काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलत आला आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हाच जुना राग गात भारतावर निशाणा साधला आहे. लंडनमध्ये पाकिस्तानी प्रवासी नागरिकांशी संवाद साधताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारतावर कडाडून टीका केली. “काश्मिरींचे रक्त व्यर्थ जाणार नाही”, असे वादग्रस्त विधान करून त्यांनी आगामी संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) भारताविरुद्ध ठाम भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेतील भाषणाद्वारे शरीफ काश्मीरसह पॅलेस्टाईन प्रश्न उचलून धरणार आहेत.
शाहबाज शरीफ नुकतेच लंडन दौऱ्यावर गेले होते. येथे त्यांनी पाकिस्तानी डायस्पोराच्या (प्रवासी पाकिस्तानी नागरिक) भेटी घेतल्या. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या नेहमीच्या अजेंड्याची पुनरावृत्ती करत भारतावर टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की
“काश्मीर प्रश्न सुटल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानचे संबंध कधीही सामान्य होऊ शकत नाहीत. काश्मिरींचे रक्त व्यर्थ जाणार नाही.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भारताविरुद्ध कटुता आणि शत्रुत्व दाखवण्याचा प्रयत्न दिसून आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आधी Tariff, आता चाबहार…’; मग का अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Trump पंतप्रधान Modi सोबत करत आहेत मैत्रीचे नाटक?
शरीफ यांनी भारत-पाकिस्तानने आतापर्यंत लढलेल्या चार युद्धांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, या युद्धांसाठी प्रचंड पैसा खर्च झाला. जर हा पैसा लोकांच्या विकासासाठी वापरला गेला असता, तर दोन्ही देशांची प्रगती आज खूप पुढे असती. मात्र त्यांनी याच भाषणात पुन्हा भारतावर दोषारोप करत संवाद फक्त “समानतेच्या आधारावर” होईल असे सांगितले.
२६ सप्टेंबर रोजी शाहबाज शरीफ संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला (UNGA) संबोधित करणार आहेत. पाकिस्तान सध्या महासभेचे अध्यक्षपद भूषवत असल्यामुळे हा मंच त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. परराष्ट्र कार्यालयाच्या निवेदनानुसार, २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महासभेच्या ८० व्या सत्रात शरीफ पाकिस्तानच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करतील. त्यांच्या सोबत उपपंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकारीही असतील.
वृत्तानुसार, शरीफ यांचा हेतू संयुक्त राष्ट्रात भारताला कोंडीत पकडण्याचा आहे. ते काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासोबतच ते पॅलेस्टाईनवरील इस्रायलच्या “बेकायदेशीर कब्जाचा” मुद्दाही उचलण्याची शक्यता आहे. गाझामधील भीषण परिस्थितीकडे लक्ष वेधून पॅलेस्टाईन्यांना मदत करण्याचे आवाहनही ते करणार असल्याचे सूत्र सांगतात.
गेल्या अनेक वर्षांत पाकिस्तानने प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र भारताने नेहमीच ठामपणे हा विषय “द्विपक्षीय” असल्याचे सांगितले आणि कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाला नकार दिला. तरीदेखील पाकिस्तान आपली भूमिका बदलण्यास तयार नाही. शाहबाज शरीफ यांच्या या विधानांनी पुन्हा हे स्पष्ट केले आहे की पाकिस्तान अजूनही जुन्या राजकारणाच्या चौकटीत अडकलेला आहे.
भारताने नेहमीच सांगितले आहे की जम्मू-काश्मीर हा त्याचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तान सतत दहशतवादाला खतपाणी घालून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, असा ठपका भारताने वारंवार ठेवला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान कितीही उग्र वक्तव्ये करत असले तरी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे महत्त्व मिळत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UN-Iran deal: ‘इराणची क्षेपणास्त्रे, शस्त्रे अन् पैसा सर्व फ्रीझ होणार’; बहुचर्चित अणुकार्यक्रमावर संयुक्त राष्ट्रांचा मोठा निर्णय
विशेष म्हणजे, पाकिस्तानची स्वतःची आर्थिक स्थिती अत्यंत ढासळलेली आहे. महागाई, बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि राजकीय अस्थिरता या समस्यांनी देश ग्रासला आहे. अशा वेळी पाकिस्तान सरकारला देशांतर्गत प्रश्नांकडून लक्ष हटवण्यासाठी भारताविरुद्ध वक्तव्य करणे सोयीस्कर ठरते. त्यामुळेच शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उचलून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, असे तज्ज्ञांचे मत आहे.
आता प्रश्न असा निर्माण होतो की, पाकिस्तान खरंच भारताशी समानतेच्या पातळीवर संवाद साधण्यास तयार आहे का? की हा फक्त राजकीय डावपेच आहे? गेल्या अनेक दशकांत पाकिस्तानने दहशतवादी गटांना पाठिंबा देऊन भारताविरुद्ध कारवाया घडवल्या आहेत. त्यामुळे संवादावर विश्वास ठेवणे कठीण वाटते. शाहबाज शरीफ यांच्या ताज्या वक्तव्यांमधून पुन्हा एकदा दिसते की पाकिस्तानचा अजेंडा बदललेला नाही. भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये सुधारणा होण्यासाठी दोन्ही देशांनी खऱ्या अर्थाने शांततेचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र पाकिस्तानचा भारतविरोधी दृष्टिकोन बदलल्याशिवाय तो दिवस दूरच दिसतो.