Sheikh Hasina accused of role in protest violence
Sheikh Hasina crimes against humanity : बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांचे गृहमंत्री असदुज्जमान खान यांच्यावर देशात मोठ्या खळबळ उडवणारे आरोप न्यायालयाने निश्चित केले आहेत. हे आरोप 2024 मध्ये झालेल्या एका तीव्र जनआंदोलनाशी संबंधित असून, या आंदोलनात शेकडो विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले होते. आंदोलन दडपण्यासाठी सरकारी यंत्रणांचा अमानवी आणि हिंसक वापर झाल्याचा आरोप आहे.
या जनआंदोलनादरम्यान देशभरात विद्यार्थ्यांचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला होता. सरकारी धोरणांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांपैकी शेकडो जण आपले प्राण गमावून बसले. या हिंसाचारात महिलांवर लैंगिक अत्याचार झाले, लहान मुलांनाही मारहाण झाली आणि गंभीर जखमींना उपचारही मिळाले नाहीत. काही ठिकाणी मृतदेह जाळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यानुसार, ही हिंसक कारवाई शेख हसीना यांनी स्वतः नियोजित केली होती. त्यांनी पक्ष, पोलिस आणि अन्य यंत्रणांना आंदोलन दडपण्यासाठी थेट आदेश दिल्याचे पुरावे समोर आले आहेत. न्यायाधिकरणाने सांगितले की, या पुराव्यांमध्ये काही ऑडिओ रेकॉर्डिंग्ज, दस्तऐवज आणि ई-मेल संवाद देखील आहेत, जे त्यांच्या थेट सहभागावर प्रकाश टाकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Watch : हेलिकॉप्टर हवेतून थेट नदीत कोसळले! अपघाताचा थरारक VIDEO सोशल मीडियावर VIRAL
शेख हसीना आणि गृहमंत्री असदुज्जमान खान सध्या भारतात असल्याचे समजते. हसीनांनी ५ ऑगस्टपासून भारतात आश्रय घेतला आहे. त्यांच्या अनुपस्थितीत बांगलादेशात खटला सुरू आहे. न्यायालयाने वर्तमानपत्रांमध्ये नोटीसा देत त्यांना हजर राहण्यास सांगितले होते, मात्र कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारताकडे अधिकृतपणे दोघांचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली आहे, परंतु अद्याप भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे दोन्ही देशांमध्ये कूटनैतिक तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मोड म्हणजे बांगलादेशचे माजी पोलीस प्रमुख चौधरी अब्दुल्ला अल-मामुन यांची अटक आणि त्यांची कबुली. त्यांनी न्यायालयात आपली चूक कबूल केली असून सरकारच्या बाजूने साक्ष देण्याची तयारी दर्शविली आहे. तज्ञांच्या मते, कमी शिक्षेच्या बदल्यात त्यांच्यासोबत करार करण्यात आला आहे. ही साक्ष शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध निर्णायक ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता NASA वरही ट्रम्प सावट! 2000 लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, वैज्ञानिक प्रकल्पांवर संकट
हसीना यांच्या पक्षाने या खटल्याला सुरूवातीपासूनच राजकीय हेतूने प्रेरित ठरवले आहे. त्यांच्या मते, सध्याचे अंतरिम सरकार हे नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या प्रभावाखाली काम करत असून, त्यांनी न्यायव्यवस्थेचा वापर करून विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.