आता NASAमध्येही घुसले ट्रम्प! 2000 लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, वैज्ञानिक प्रकल्पांवर संकट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Trump NASA layoffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे जागतिक कीर्तीच्या नासामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नासामधील सुमारे 2,000 वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना ट्रम्प प्रशासनाने आखली होती, आणि त्यामुळे अंतराळ संशोधनाच्या अनेक मोठ्या प्रकल्पांवरही संकटाचे ढग दाटून आले आहेत. या निर्णयाचे मुख्य कारण म्हणजे बजेटमध्ये मोठी कपात. ट्रम्प प्रशासनाने नासाच्या अर्थसंकल्पात कपात केल्याने ही नोकरी कपात अपरिहार्य झाली आहे. देशभरातील १० प्रमुख नासा केंद्रांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
या कर्मचाऱ्यांमध्ये GS-13 ते GS-15 या श्रेणीतील अधिकारी आहेत, जे नासामध्ये व्यवस्थापन, तांत्रिक सल्ला आणि संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होते. विशेष म्हणजे, यामध्ये अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या अनुभवी तज्ञांचाही समावेश आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, याचा थेट परिणाम नासाच्या कार्यक्षमतेवर आणि भविष्यातील महत्वाकांक्षी मोहिमांवर होऊ शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : असीम मुनीर राष्ट्रपती होणार? पाकिस्तान सरकारचा सत्तापालटाच्या अफवांवर धक्कादायक खुलासा
सरकारकडून या कर्मचाऱ्यांना अचानक बाहेरचा रस्ता दाखवण्याऐवजी काही निवडक योजनाही दिल्या जात आहेत. लवकर निवृत्ती, स्वेच्छा राजीनामा, आर्थिक प्रोत्साहन यासारख्या योजना वापरून एकूण 2,145 कर्मचाऱ्यांना ऑफर देण्यात आली आहे. यातील 1,818 कर्मचारी विज्ञान, मानव मोहिमा, रोबोटिक्स, आणि प्रगत संगणकीय प्रणाली यांसारख्या महत्वाच्या विभागांमध्ये कार्यरत होते.
या प्रकरणावर नासाच्या प्रवक्त्या बेथानी स्टीव्हन्स यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “NASA आपल्या मिशनप्रती पूर्णतः समर्पित आहे. आम्ही मर्यादित संसाधनांमध्ये काम करत असलो तरीही आमची गुणवत्ता आणि मोहिमांचे यश अबाधित ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.” दुसरीकडे, अंतराळ धोरण तज्ज्ञ केसी ड्रायर यांनी चिंता व्यक्त करत म्हटले, “एजन्सी तिचे महत्वाचे तांत्रिक आणि व्यवस्थापन कौशल्य गमावत आहे. हा निर्णय केवळ कर्मचाऱ्यांच्या पातळीवर नाही, तर संपूर्ण अंतराळ धोरणावर परिणाम करणारा आहे.” त्यांनी असा प्रश्नही उपस्थित केला की, “या हालचालीमागे नेमकी रणनीती काय आहे, आणि यामधून काय साध्य होणार?”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump new Tariff policy: डोनाल्ड ट्रम्प यांचा जगावर नवा टॅरिफ बॉम्ब! 22 देशांना पत्र, भारतासाठीही धोका?
NASA ही संस्था केवळ अमेरिकेसाठीच नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी विज्ञान, शोध आणि भविष्यातील शक्यता यांचे प्रतीक मानली जाते. अशा वेळी अचानक हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात येणे, याचे परिणाम भविष्यात अंतराळ संशोधनाच्या दिशेवर होऊ शकतात. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाची पुनर्रचना किंवा नव्या धोरणाची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.