South Korea Plane Crash: जेजू एअरलाइन्सने दक्षिण कोरियातील विमान अपघाताबद्दल मागितली जाहीर माफी
सियोल: दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (29 डिसेंबर 2024) भीषण विमान अपघात झाला. जेजू एअरलाइन्सचे हे विमान असून, यामध्ये 181 प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य होते, लँडिंगदरम्यान रनवेवरून घसरले आणि विमानतळाच्या भिंतीला धडकले. या भीषण अपघातात 179 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तर, दोन जणांना जिवंत वाचवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सकाळी 9:07 वाजता हा अपघात घडला.
जेजू एअरलाइन्सने मागितली माफी
या दुर्घटनेनंतर जेजू एअरलाइन्सने शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी जाहीरपणे माफी देखील मागितली आहे. कंपनीने याबाबत निवेदन जारी केले असून, निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही या अपघातामुळे होणाऱ्या कोणत्याही त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही या दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी आणि सर्वतोपरी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.” कंपनीने शोकाकुल कुटुंबांना मदत करण्यासाठी विशेष टीम नेमली आहे. बँकॉकहून परतणाऱ्या या विमानात चालक दलाच्या 6 सदस्यांसह 181 लोक प्रवास करत होते. बहुतेक प्रवासी कोरियन नागरिक होते, तर दोन प्रवासी थायलंडचे होते. कंपनीने प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
#BREAKING An Image from the Crash Site of Jeju Air Flight 2216 at Muan International Airport in South Korea, showing the Tail of the Aircraft engulfed in Flame@fastnewsnet pic.twitter.com/PBNOEyx0DW
— Abdul khabir jamily (@JamilKhabir396) December 29, 2024
अपघाताचे कारण
स्थानिक अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष्यांची धडक बसल्याने आणि प्रतिकूल हवामानामुळे हा अपघात झाला. मात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात विमान लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर, स्थानिक माध्यमांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये विमान लँडिंग गियर न उघडता उतरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या बिघाडाला पक्ष्याच्या धडकेमुळे नुकसान होणे हे कारण असू शकते.
लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसर्या प्रयत्नादरम्यान हा अपघात झाला. धावपट्टी संपेपर्यंत विमानाची गती कमी करण्यात यश आले नाही त्यामुळे विमानतळाच्या टोकाला असलेल्या भिंतीवर विमान आदळले आणि त्याने पेट घेतला असेही त्यांनी सांगितले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.
सरकारची तातडीची बैठक
या दुर्घटनेनंतर दक्षिण कोरियाचे अध्यक्षांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत विमान अपघातावरील सरकारी प्रतिक्रिया आणि बचावकार्याबाबत चर्चा होणार आहे. हा अपघात देशासाठी मोठी शोकांतिका ठरली आहे आणि देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.