Strait Of Hormuz : ओमानच्या किनाऱ्याजवळ कुवैती टँकरवर क्षेपणास्त्र धडकले; ओमान प्रशासनाच्या मदतीने ५ भारतीयांना वाचवण्यात यश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
जागतिक स्तरावर अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. नुकत्याच घडलेल्या एका खळबळजनक घटनेत, कुवैती ध्वज असलेल्या ‘एमटी काझिमा III’ (MT Kazima III) या तेलवाहू टँकरवर क्षेपणास्त्रासारख्या शस्त्राने भीषण हल्ला करण्यात आला. या जहाजावर भारतीय खलाशी कार्यरत होते. सुदैवाने, हल्ला झाल्यानंतर ओमानमधील भारतीय दूतावास आणि ओमानच्या स्थानिक प्रशासनाने तातडीने बचाव मोहीम राबवून टँकरवरील पाचही भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यांना किनाऱ्यावर आणले आहे.
ओमानमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर अधिकृत माहिती देताना सांगितले की, “सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीत क्षेपणास्त्राचा फटका बसलेल्या ‘एमटी काझिमा III’ या कुवैती टँकरवरील पाच भारतीय नागरिकांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. सर्वांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून बचाव कार्यात मोलाचे सहकार्य करणाऱ्या ओमान प्रशासनाचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.” हे जहाज कुवैतचा ध्वज लावून कच्चे तेल (Crude Oil) वाहून नेत होते आणि ते टोगोमधील लोमे (Lome) बंदराच्या दिशेने प्रवासावर होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Visa Policy 2026 : अमेरिकेचा व्हिसा हवाय? तर सोशल मीडिया प्रोफाइल ठेवावे लागणार ‘पब्लिक’; ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश
पर्शियन आखात आणि लगतच्या सागरी मार्गांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत कमालीचे सतर्क झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना स्पष्ट केले की, सध्या पर्शियन आखातामध्ये विविध परदेशी आणि भारतीय व्यापारी जहाजांवर ४,५०० हून अधिक भारतीय खलाशी कार्यरत आहेत.
Earlier today, the Mission coordinated rescue of five Indian nationals on board the Kuwait-flagged tanker MT Kazimah III, struck by a projectile in the Strait of Hormuz. All 5 Indian nationals have been shifted ashore safely. We thank the Omani authorities for their continued… — India in Oman (Embassy of India, Muscat) (@Indemb_Muscat) October 2, 2026
credit – social media and Twitter
जयस्वाल यांनी पुढे सांगितले की, “सध्या या क्षेत्रात भारताचा ध्वज असलेली ६ व्यापारी जहाजे आणि भारतासाठी माल वाहतूक करणारी ६ परदेशी ध्वज असलेली जहाजे अशी एकूण १२ जहाजे थेट कार्यरत आहेत. या १२ जहाजांवर १६३ भारतीय खलाशी तैनात आहेत. नौवहन मंत्रालय (Ministry of Shipping), भारतीय राजनैतिक दूतावास आणि स्थानिक सागरी यंत्रणांच्या मदतीने सर्व जहाजांच्या हालचालींवर आणि खलाशांच्या सुरक्षेवर २४ तास बारीक लक्ष ठेवले जात आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Flydubai Flight 1073 : ‘मला जिवंत सोडू नका!’ प्रवाशांनी पकडल्यानंतर ओमानच्या वैमानिकाची मृत्यूची याचना
गेल्या काही महिन्यांपासून पर्शियन आखात, तांबडा समुद्र (Red Sea) आणि काळा समुद्र (Black Sea) या प्रमुख सागरी व्यापारी मार्गांवर व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जात आहे. या वाढत्या धोक्याची गंभीर दखल भारताने जागतिक व्यासपीठावर घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या (UNGA) ८१ व्या अधिवेशनात बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या मुद्द्यावर जगाचे लक्ष वेधले.
जयशंकर यांनी आपल्या भाषणात अत्यंत कठोर शब्दांत सांगितले की, “जमिनीवरील युद्ध आणि तणावामुळे आधीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना, आता समुद्रातील व्यापारी जहाजे आणि निष्पाप खलाशांना लक्ष्य केले जात आहे. आखाती देशांपासून ते तांबड्या समुद्रापर्यंत घडणाऱ्या या घटनांमध्ये भारतीय खलाशांसह अनेक देशांतील नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. व्यापारी मार्गांवर अशा प्रकारे होणारे हल्ले हे पूर्णपणे अस्वीकार्य (Unacceptable) आहेत.” भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये हा मुद्दा लावून धरल्यामुळे जागतिक स्तरावर सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रात आला आहे.






