Suicide bomber hits Pakistan military vehicle in Khyber Pakhtunkhwa, 13 soldiers killed
Pakistan News Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रातंता पुन्हा एकदा मोठा आत्मघाती हल्ला झाला आहे. यामध्ये पाकिस्तानच्या १३ जवानांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तानमध्ये मोठा आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला. ज्यात १३ सैनिक जागीच ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले आहेत. मीर अली खादी मार्केटमध्ये हा हल्ला झाला. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ७.४० वाजता हा हल्ला झाला. एका मोठ्या आत्मघाती कार बॉम्बने पाकिस्तानच्या लष्करी वाहनाला धडत दिली. हे पाकिस्तानचे बॉम्बविरोधी युनिटचे वाहन होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानच्या उसुद-उल-हरब या गटाने स्वीकारली आहे. हा गट तहरीक-ए-तालिबानचा (टीटीपी)चा एक भाग आहे.
स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसर, आत्मघातकी वाहनाने लष्कराच्या ताफ्यावर एका वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे भीषण स्फोट झाला. या स्फोटात १३ सैनिक ठार झाले, १० लष्करी कर्मचारी आणि १९ नागरिक जखमी झाले. यामुळे लोकांच्या घरांचे आणि मार्केटचेही मोठे नुकसान झाले.
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा परिस्थिती हा हल्ला झाल्याने पाकिस्तान सरकारच्या देशातील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
यामुळे बलुचिस्तानच्या लिबरेशन आर्मीने (बीएलए) स्वतंत्र्य बलुचिस्तानची मागणी केली आहे. तसेच बलुचिस्तान आर्मीने पाकिस्तान सरकारविरोधी बंड पुकारले आहे. शिवाय गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानमध्ये टीटीपीशी संबंधित १० संशयित दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
मार्च २०२५ मध्ये बलुच लिबरेशन आर्मीने (BLA)च्या बंडखोरांनी गुडालर आणि पिरु कुनरीजवळ जाफर एक्सप्रेसवर हल्ला केला होता. यामध्ये २१ प्रवासी आणि तार निमलष्करी कर्मचारी ठार झाले होते. पाकिस्तान सरकारच्या दहशतवाद्याला पाठिंब्यामुळे बीएलएने बंड पुरकारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२५ च्या सुरुवातीपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादाशी संबंधित मृतांमध्ये ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलहाचे वातावरण आहे. परंतु अद्याप यावर पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही.