The remains of a Chinese PL-15 missile have been found in India
Chinese PL-15 missile : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलीकडील संघर्षानंतर एक अत्यंत महत्त्वाचा आणि जागतिक स्तरावर संवेदनशील घटक भारताच्या ताब्यात आला आहे. हा घटक म्हणजे चीनने बनवलेले PL-15 हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, ज्याचा काही भाग पंजाबच्या होशियारपूर भागात सापडला आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध या आधुनिक चिनी क्षेपणास्त्राचा वापर केला होता. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी या हल्ल्याला यशस्वीपणे अडवून हे क्षेपणास्त्र खाली पाडले आणि त्याचे अवशेष भारताच्या हाती लागले.
आता हेच अवशेष जगातील प्रमुख लष्करी आणि गुप्तचर संस्थांच्या केंद्रस्थानी आले आहेत. फाइव्ह आयज इंटेलिजन्स अलायन्स (अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड), फ्रान्स आणि जपान हे देश भारताकडून या अवशेषांची मागणी करत आहेत. कारण, PL-15 क्षेपणास्त्र हे चीनच्या अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचे प्रतिनिधित्व करते आणि त्याचे विश्लेषण केल्याने चीनच्या हवाई शक्तीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.
चायना एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन (AVIC) द्वारा विकसित PL-15 हे लांब पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. यामध्ये AESA (Active Electronically Scanned Array) रडार सीकर, ड्युअल-पल्स रॉकेट मोटर, आणि टू-वे डेटा लिंक यांसारखी अद्ययावत प्रणाली आहे.
PL-15 ची मूळ चिनी आवृत्ती २०० ते ३०० किमी पर्यंतच्या टप्प्यात लक्ष्य भेदू शकते, तर पाकिस्तानकडून वापरलेली PL-15E आवृत्ती सुमारे १४५ किमी रेंजची आहे. हे क्षेपणास्त्र लढाऊ विमाने, हवाई पूर्वसूचना प्रणाली (AWACS) आणि इतर हाय-वॅल्यू टार्गेट्सला लक्ष्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भीतीमुळे पाकिस्तानी सैन्याचे धाबे दणाणले; बलुचिस्तान नियंत्रणाबाहेर अन् स्वातंत्र्याची घोषणा
PL-15 च्या रडार, मार्गदर्शन यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक वारफेअर तंत्रज्ञानाचे विश्लेषण केल्याने चीनच्या संरक्षण तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळू शकते. अमेरिका आणि तिचे सहकारी देश चीनच्या लष्करी विस्ताराला इंडो-पॅसिफिक भागात मोठे धोका मानतात. त्यामुळे PL-15 चे अवशेष चिनी तंत्रज्ञानाविरोधातील आगामी रणनीती तयार करण्यासाठी ‘सोन्याचे खजिने’प्रमाणे आहेत. फ्रान्ससाठीही हे महत्त्वाचे आहे. कारण, त्याच्या राफेल लढाऊ विमानांची क्षमता चिनी तंत्रज्ञानासमोर टिकते की नाही, याचा अभ्यास करण्यासाठी हे क्षेपणास्त्र महत्त्वाचे ठरते. भारताला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे विकणाऱ्या देशांमध्ये फ्रान्स अग्रगण्य आहे.
भारताकडे हे क्षेपणास्त्राचे अवशेष आल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय लष्करी सामर्थ्यातील स्थान अधिक मजबूत झाले आहे. भारत सर्वोच्च गुप्तचर संघटनांसाठी एक विश्वासार्ह आणि सामरिक सहकारी बनला आहे. भारत PL-15 चा अभ्यास करून स्वतःच्या हवाई संरक्षण प्रणालींना अधिक मजबूत करू शकतो, शिवाय चिनी तंत्रज्ञानाविरोधात काउंटर स्ट्रॅटेजीज तयार करण्यास मदत होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सर्वांनीच सोडली पाकिस्तानची साथ; भारताने अफगाणिस्तानसाठी केले मोठे मन, वाचा सविस्तर…
PL-15 क्षेपणास्त्राचे भारताच्या हाती लागलेले अवशेष हे भविष्यातील युद्ध आणि सामरिक समीकरणांसाठी अत्यंत मौल्यवान आहेत. हे केवळ शस्त्रास्त्र नव्हे, तर चीनच्या लष्करी योजनेचा आरसा आहे. भारताने जर या तंत्रज्ञानाचे अचूक विश्लेषण केले, तर ते भविष्यात चिनी आक्रमकतेच्या विरोधात एक प्रभावी ‘ब्रह्मास्त्र’ ठरू शकते – आणि त्याचबरोबर भारताला जागतिक सामरिक चर्चांमध्ये अग्रभागी स्थान मिळवून देईल.