नवी दिल्ली – तालिबानने विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्यास बंदी घातली. वृत्तानुसार, तालिबानने काबुलमधील विद्यार्थिनींना कझाकिस्तान आणि कतारसारख्या देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्यास मनाई केली. मुलांना केवळ काबूल सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने प्रथम शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यास सुरुवात केली. तालिबान सरकारने मुलींसाठी हायस्कूल आणि कॉलेज देखील बंद केले. महिलांनी विरोध केल्यानंतर शाळा सहावीपर्यंत सुरू झाल्या. अलीकडेच, अफगाणिस्तानचे गृहमंत्री आणि तालिबानचे सह-उपनेते सिराजुद्दीन हक्कानी यांनी हायस्कूल उघडण्याचे आश्वासन दिले. मात्र आता उच्च शिक्षणाविरोधात नवे फर्मान काढण्यात आले आहे.
अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यानंतर तालिबानने महिलांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य देऊ, असे म्हटले होते. पण गेल्या वर्षभरात अफगाणिस्तानात राहणाऱ्या महिलांची स्थिती लपलेली नाही. येथे महिलांवर अत्याचार होत आहेत. कुटुंबातील मुलींना मुलांपेक्षा कमी खायला मिळत आहे.