Thousands of years of Indian influence Yet how did Indonesia become the world's largest Muslim country
यंदा भारताच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात येण्याची ही इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींची 5वी वेळ आहे. यापूर्वी पहिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना देखील प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
खरं तर भारत आणि इंडोनेशियाचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. इंडोनेशिया आज जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश आहे, मात्र एकेकाळी हिंदू आणि बौद्ध धर्माची राजवट या देशात होती. आज हा देश जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातो. आज आपण हा देश जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश कसा बनला याचा रोचक इतिहास जाणून घेणार आहोत.
इंडोनेशियातील हिंदू आणि बौद्धांचे वर्चस्व
प्राचीन काळात इंडोनेशिया व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होता. बुनी किंवा मुनी सभ्यता ही इंडोनेशियाची सर्वात जुनी सभ्यता होती. इ. स. पूर्व चौथ्या शतकातपर्यंत या देशात हिंदू आणि बौद्ध धर्माचा लक्षणीय पाय रोवला गेला. इंडोनेशियात २ हजार वर्षांहून अधिक काळ हिंदू-बौद्ध राजांची राजवट होती. त्रिभुवन आणि कीर्तनेगर यांसारख्या राजांनी इंडोनेशियाच्या भूमीवर राज्य केले. भारत आणि चीनसोबतच्या व्यापारसंबंधांमुळे या देशात भारतीय संस्कृतीचे आणि धर्मांचे बीज रुजले.
इंडोनेशियातील साधनसंपत्तीमुळे हा देश कायमच परदेशी लोकांसाठी प्राधन्य राहिला. जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक धर्मांचे लोक येथे आले. यावेळी 13व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्व जावामध्ये हिंदू मजपहित साम्राज्याचा उदय झाल. इंडोनेशियामध्ये आजही याचा प्रभाव पाहायला मिळतो. हा काळ इंडोनेशियाचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो.
इस्लाम धर्माचा प्रसार
मिळालेल्या माहितीनुसार, इ.स. 8 व्या शतकात अरब व्यापारी इंडोनेशियामध्ये आले. त्यानंतर इस्लाम धर्माचा प्रचार-प्रसार 13व्या शतकात सुरू झाला. सुरुवातीला इस्लाम व्यापाऱ्यांनी आणि विद्वानांनी मिशनरी कार्यातून पसरवला. नंतर काही स्थानिक राज्यकर्त्यांनी इस्लाम धर्म स्वीकरण्याची इच्छा दाखवली. व्यापाऱ्यांनी स्थानिक महिलांशी विवाह केल्यामुळेही इस्लाम धर्माचा प्रसार सुरु झाला.
इस्लामच्या प्रभावामुळे 13व्या शतकात सुमात्राच्या उत्तर भागात इस्लामिक राज्यांची स्थापना झाली. 14व्या-15व्या शतकांमध्ये मलाक्का सल्तनतीसारख्या सागरी साम्राज्यांनी इस्लाम धर्माचा प्रचार आणखी वाढवला. व्यापार, विवाह, आणि तलवारीच्या जोरावर धर्मांतरही झाले. तरीही, हिंदू आणि बौद्ध धर्माचा प्रभाव आजही इंडोनेशियाच्या संस्कृतीत दिसतो. रामायण आणि महाभारत ही ग्रंथं इंडोनेशियामध्ये पवित्र मानली जातात.
आजची स्थिती
आज इंडोनेशियात 27 कोटी लोकसंख्या असून त्यापैकी 90% लोक मुस्लिम आहेत. बहुसंख्य सुन्नी मुस्लिम, शिया मुस्लिम आणि अहमदी मुस्लिमांचीही संख्या अधिक आहे. परंतु, मुस्लिम बहुसंख्य असला तरी इंडोनेशिया इस्लामिक राज्य नाही. हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून येथे सहा धर्मांना अधिकृत मान्यता दिली जाते.
भारतासारखा समृद्ध वारसा असलेला इंडोनेशिया आजही विविधतेने नटलेला आहे. तिथे हिंदू आणि बौद्ध धर्माच्या परंपरा आणि सणांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांमुळेच भारत आणि इंडोनेशियामधील मैत्री अधिक दृढ झाली आहे.