'वचन दिले गेले, आश्वासन पाळले गेले'; अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यास सुरुवात (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना काढण्याच्या निर्णयावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. शपथ घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून हाकलून लावण्याच्या कार्यकारी आदेशावर लगेचच स्वाक्षरी केली होती. आता या लोकांना लष्करी विंमानांमधून सीमेपलीकडे नेण्यात येत आहे. यासंबंधित व्हाईट हाऊसने एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे. शेअर केलेल्या या छायाचित्रात बेकायदेशीर स्थलांतरितांना हातकड्या लावून लष्करी विमानाकडे नेले जात असल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहिनुसार, पहिल्या दिवशी 160 स्थलांतरितांना दोन लष्करी विमानांमधून ग्वाटेमालाला पाठवण्यात आले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याचे आश्वासन दिले होते. शपथविधीनंतर लगेचच त्यांनी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशांमध्ये या मोहिमेचा समावेश होता. त्यांच्या प्रशासनाने आता या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. व्हाईट हाऊसच्या निवेदनानुसार, ‘जो कोणी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करेल, त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,’ असा संदेश जगाला देण्यात आला आहे.
Just as he promised, President Trump is sending a strong message to the world: those who enter the United States illegally will face serious consequences. pic.twitter.com/yqgtF1RX6K
— The White House (@WhiteHouse) January 24, 2025
अमेरिकन प्रशासनाचे कठोर धोरण स्पष्ट
गृह सुरक्षा विभागाच्या मते, ग्वाटेमाला आणि अमेरिका दोन्ही देश बेकायदेशीर स्थलांतर पूर्णतः थांबवण्यासाठी आणि सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहेत. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ग्वाटेमालाला पाठवलेल्या दोन उड्डाणांद्वारे त्याची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे बेकायदेशीर स्थलांतरितांवर कडक कारवाई सुरू झाली असून, अमेरिकन प्रशासनाचे कठोर धोरण स्पष्ट होत आहे. प्रशासनाने स्थलांतरितांना शोधून त्यांची ओळख पटवून त्यांना त्वरित हद्दपार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे.
‘वचने दिली गेली, आश्वासने पाळली गेली
व्हाईट हाऊसने त्यांच्या पोस्टमध्ये ‘वचने दिली गेली, आश्वासने पाळली गेली’ असा संदेश दिला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या धोरणामुळे स्थलांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, या कठोर निर्णयाचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे दोन्ही मतप्रवाह निर्माण झाले आहेत. हा निर्णय भविष्यात अमेरिकेच्या स्थलांतर धोरणांवर मोठा प्रभाव पाडणार आहे.