Trump faces opposition over DC police takeover threatens national emergency
अमेरिकन अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या नॅशनल गार्ड तैनात करण्याच्या आणि पोलिसांवर ताबा घेण्याच्या निर्णयाला विरोध केला.
या विरोधामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीत आणीबाणी लागू करण्याची धमकी दिली.
ट्रम्प यांनी महापौर बाऊसरवर आरोप करून आयसीईला सहकार्य न करण्याच्या निर्णयामुळे पुन्हा गुन्हेगारी वाढेल, असा इशारा दिला.
Trump DC police takeover : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्रमक आणि वादग्रस्त शैलीत निर्णय घेण्याचा इतिहास जगभर परिचित आहे. कधी कठोर कारवाई तर कधी बिनधास्त विधानं या दोन्हीमुळे ते चर्चेत राहतात. आता पुन्हा एकदा वॉशिंग्टन डीसीमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकन राजकारणात हलकल्लोळ माजला आहे.
गुन्हेगारी कमी करण्याच्या नावाखाली ट्रम्प यांनी काही काळापूर्वी राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्ड तैनात केले होते. त्याचबरोबर मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाचा ताबाही त्यांनी घेतला. ट्रम्प यांच्या मते, या पावलांमुळे डीसीतील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर घट झाली. “काही आठवड्यांतच डीसी अमेरिका आणि जगातील धोकादायक शहरांमधून सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक बनले,” असा दावाही त्यांनी केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump News : शांतीदूत बनण्याचे नाटक करून ट्रम्प स्वतःच युद्धाच्या तयारीत व्यस्त; ‘या’ देशावर करणार हल्ला?
मात्र, डीसीच्या महापौर मुरिएल बाऊसर यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी जाहीर केले की, मेट्रोपॉलिटन पोलिस विभाग आता बेकायदेशीर परदेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करणाऱ्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ला कोणतीही मदत करणार नाही. बाऊसर यांच्या या निर्णयामागे “डाव्या विचारसरणीच्या दबावाचा परिणाम” असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
या निर्णयामुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी थेट आणीबाणी लागू करण्याची धमकी दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – “जर मेट्रोपॉलिटन पोलिसांनी आयसीईसोबतचे सहकार्य संपवले, तर मी संघीय पातळीवर हस्तक्षेप करेन. गरज पडली तर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात अजिबात मागेपुढे पाहणार नाही.”
credit : social media and @Truth
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक विस्तृत पोस्ट करून या विषयावर भूमिका मांडली. त्यात त्यांनी दावा केला की, त्यांच्या नेतृत्वाखाली डीसीमधील गुन्हेगारी जवळजवळ संपुष्टात आली. “आज डीसी एक समृद्ध, उत्साही आणि सुरक्षित शहर बनले आहे. रेस्टॉरंट्स, दुकाने आणि व्यवसाय पुन्हा भरभराटीला आले आहेत. हे दशकांतील सर्वात मोठे यश आहे,” असे त्यांनी लिहिले.
ट्रम्प यांच्या मते, महापौर बाऊसर यांचा निर्णय डीसीसाठी धोकादायक ठरेल. “जर पोलिसांनी आयसीईला मदत करणे थांबवले, तर बेकायदेशीर स्थलांतरितांवर नियंत्रण राहणार नाही. यामुळे पुन्हा गुन्हेगारी वाढेल आणि शहर अराजकतेच्या गर्तेत जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vision2030 : दीर्घायुष्याचा सौदी फॉर्म्युला! जाणून घ्या ‘या’ देशाने कसे पोहोचवले नागरिकांचे आयुर्मान 46 वरून 79 वर
या संपूर्ण घडामोडीमुळे अमेरिकन राजकारणात नवा संघर्ष उभा राहिला आहे. ट्रम्प यांचा कठोर भूमिकांचा इतिहास लक्षात घेता, आणीबाणी लागू करण्याची त्यांची धमकी केवळ शब्दांत मर्यादित राहील की प्रत्यक्षात अमलात आणली जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की, ट्रम्प यांच्या कारकिर्दीत राजकीय निर्णयांपेक्षा वैयक्तिक ठाम भूमिका आणि संघर्षाची तयारी यांनाच अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे पुढील काही दिवसांत डीसीच्या राजकीय वातावरणात आणखी तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.