Trump tariffs India Japan Australia
Trump tariffs India Japan Australia : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर टॅरिफ धोरणामुळे जागतिक राजकारणात नवे समीकरण तयार होत आहेत. भारतावर 50 टक्के कर लादल्यापासून या भू-राजनैतिक पटावर एकाच वेळी दोन वेगवेगळे गट निर्माण होऊ लागले आहेत. एकीकडे रशिया–भारत–चीन या त्रिकुटाचा प्रभाव दिसतोय, तर दुसरीकडे भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया अशी स्वतंत्र युती तयार होण्याची चिन्हे आहेत. या नव्या घडामोडी इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तुळात वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानच्या दौर्यावर असून, त्याच वेळी टोकियोने अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित $५५० अब्ज गुंतवणूक कराराला थोडा विराम दिला आहे. जपानचे मुख्य व्यापार वार्ताकार र्योसेई अकाझावा यांचा अमेरिका दौरा शेवटच्या क्षणी पुढे ढकलण्यात आला. ते या कराराची रूपरेषा ठरवण्यासाठी वॉशिंग्टनला जाणार होते. मात्र, अमेरिकेच्या प्रशासकीय स्तरावर अजून अनेक मुद्द्यांवर चर्चा व्हायची असल्याचे कारण देत हा दौरा थांबवण्यात आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tianjin Summit 2025 : 31 ऑगस्टपासून तियानजिनमध्ये मोठी तयारी; ‘आशिया आणि जगाचे भविष्य बदलणार’ पुतीन यांचा इशारा
ऑस्ट्रेलियाने तर ट्रम्पच्या टॅरिफ धोरणावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी सार्वजनिकरित्या अमेरिकेच्या कर आकारणीवर तीव्र टीका केली. अमेरिकेसोबत मुक्त व्यापार करार (FTA) अस्तित्वात असूनही ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियावर १० टक्के कर लादला आहे. याशिवाय, स्टील आणि ॲल्युमिनियमवर ५० टक्के तर औषधांवर तब्बल २५० टक्के कर लावण्याची धमकी दिली आहे. याचा थेट परिणाम ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेवर होत असून ते या परिस्थितीकडे “आर्थिक हल्ला” म्हणून पाहत आहेत.
या तणावाला अधिक हवा मिळाली ती कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेत. येथे भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता होती. मात्र, इस्रायल-इराण संघर्षामुळे ट्रम्प यांनी परिषदेतून लवकर निघून गेल्याने ही बैठक अचानक रद्द झाली. त्यातच ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिल्याने अमेरिकेची नाराजी आणखी वाढली.
जपानही ट्रम्पच्या कठोर आर्थिक रणनीतीवर समाधानी नाही. प्रस्तावित $५५० अब्ज गुंतवणूक पॅकेजवर त्यांनी थेट वॉशिंग्टनला आपली असहमती कळवली आहे. परिणामी, चर्चेवर आत्ता विराम लागला आहे. दरम्यान, चीन आणि जपान यांच्यातील संबंध काही प्रमाणात सुधारताना दिसत आहेत. प्रवास निर्बंध शिथिल झाले आहेत आणि आर्थिक चर्चा सुरू झाल्या आहेत, तरीही सुरक्षा विषयक मतभेद कायम आहेत.
भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तिन्ही देश सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभे आहेत. क्वाड (QUAD) नावाच्या विद्यमान गटात अमेरिका असूनही या देशांनी स्वतंत्र युतीबद्दल विचार सुरू केल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाने त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेवर आणि अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, भारताचा या समीकरणात दोन्ही बाजूंशी संवाद सुरू आहे. पंतप्रधान मोदी जपान दौरा पूर्ण करून पुढे चीनमध्ये होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे भारताची भूमिका अधिक निर्णायक ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Tariffs Illegal : देश उद्ध्वस्त होईल… ट्रम्प यांची अवस्था बिकट, अमेरिकन न्यायालयाने ‘टॅरिफलाच’ घोषित केले बेकायदेशीर
जगाचे भू-राजनैतिक समीकरण वेगाने बदलत आहे. ट्रम्पच्या टॅरिफ धोरणामुळे जुन्या मैत्री मोडीत निघत आहेत आणि नवी आघाड्या तयार होत आहेत. भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश सध्या नव्या संधींच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या तिघांची स्वतंत्र युती आकार घेतली, तर ती इंडो-पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेसाठी मोठे आव्हान ठरू शकते.