Tianjin Summit : ३१ ऑगस्टपासून तियानजिनमध्ये मोठी तयारी; 'आशिया आणि जगाचे भविष्य बदलणार' पुतीन यांचा इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Putin Tianjin preparations : ३१ ऑगस्टपासून चीनमधील तियानजिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेची (SCO) ऐतिहासिक शिखर परिषद होत आहे. या परिषदेतून केवळ आशियाच नव्हे तर संपूर्ण जगाच्या भविष्यातील दिशादर्शक नवे संकेत मिळतील, असे मत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या विशेष लेखी मुलाखतीत व्यक्त केले.
पुतिन यांनी सांगितले की, एससीओ शिखर परिषद ही आजच्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सदस्य देशांच्या क्षमतेला नवी धार देईल. दहशतवाद, आर्थिक संकटे, हवामान बदल, तंत्रज्ञानातील बदलते प्रवाह आणि ऊर्जा सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर ही संघटना एकत्रित भूमिका घेऊ शकेल. त्यांच्या मते, “एससीओची ताकद तिच्या साध्या पण प्रभावी तत्त्वांमध्ये आहे समान भागीदारी, परस्पर आदर, कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य न करणे आणि प्रत्येक राष्ट्राच्या ओळखीचा सन्मान राखणे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Simferopol Sunk : रशियाचे समुद्रात शक्तिप्रदर्शन; युक्रेनची सर्वात मोठी युद्धनौका ‘सिम्फेरोपोल’ ड्रोनने उडवली, VIDEO VIRAL
पुतिन यांनी आपल्या विचारांमध्ये ठामपणे नमूद केले की, जगात सध्या असंतुलन आणि संघर्षाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत एससीओ सारख्या संघटनांचा सहभाग अधिक संतुलित, न्याय्य आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ही व्यवस्था आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित असेल आणि संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका मध्यवर्ती राहील. युरेशियन प्रदेशात एक अभेद्य सुरक्षा संरचना उभारणे, आर्थिक-सांस्कृतिक संबंध अधिक घट्ट करणे आणि सदस्य देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढवणे हेच या परिषदेमधील मुख्य उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
२०२४-२५ या कालावधीत चीन एससीओचे अध्यक्षपद भूषवत आहे. चीनच्या अध्यक्षतेखाली निश्चित केलेल्या प्राधान्यांना रशिया संपूर्ण पाठिंबा देत असल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले. त्यात विशेषतः व्यापारवाढ, ऊर्जा सहकार्य, पायाभूत सुविधा विकास, प्रादेशिक सुरक्षा आणि तंत्रज्ञान विनिमय यांचा समावेश आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ही शिखर परिषद एससीओच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. आपल्या संयुक्त प्रयत्नांमधून संघटनेला नवीन ऊर्जा मिळेल आणि ती काळाच्या गरजांनुसार अधिक सक्षम होईल.”
३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२५ या दोन दिवसांत होणाऱ्या या परिषदेसाठी चीनने तियानजिनमध्ये मोठी तयारी सुरू केली आहे. चीनच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला आणि या परिषदेला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड महत्त्व दिले जात आहे. या बैठकीत भारत, रशिया, चीन, पाकिस्तान, इराण, मध्य आशियातील देश तसेच अनेक संवाद भागीदार देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. जागतिक घडामोडींवर थेट परिणाम करणाऱ्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Canada Ties : 10 महिन्यांचा संघर्ष संपला! भारत-कॅनडा संबंध पुन्हा सुधारले; कार्नी सरकारकडून नवा अध्याय सुरू
या परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. भारताने गेल्या काही वर्षांत ऊर्जा सुरक्षा, डिजिटल अर्थव्यवस्था, कनेक्टिव्हिटी आणि दहशतवादविरोधी लढा या क्षेत्रांत आपले ठोस दृष्टिकोन मांडले आहेत. तियानजिन परिषदेत या भूमिकांना नवी दिशा मिळू शकते. पुतिन यांनी स्पष्ट केले आहे की, एससीओ हा फक्त प्रादेशिक गट नाही, तर जागतिक व्यवस्थेला नवीन आकार देणारी एक महत्त्वाची शक्ती आहे. या परिषदेतून आशिया तसेच संपूर्ण जगासाठी नवा विकासमार्ग आणि स्थिरतेची नवी हमी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.