Turkey Indian Ocean strategy : तुर्कीचे पाकिस्तानशी वाढते जिव्हाळ्याचे संबंध आणि काश्मीरप्रती सातत्याने घेतलेली भूमिका पाहून भारतात तुर्कीविरोधी भावना वाढल्या आहेत. बहुतेक भारतीय नागरिकांचा विश्वास आहे की, तुर्कीचे पाकिस्तानप्रेम इस्लामी एकतेवर आधारित आहे. परंतु भू-राजकीय विश्लेषकांच्या मते ही समजूत अपुरी आणि धोरणात्मकदृष्ट्या अपायकारक ठरू शकते. तुर्कीच्या पाकिस्तानसमोरील धोरणामागे इस्लामी भावनांबरोबरच हिंद महासागर क्षेत्रात पाय रोवण्याचा दीर्घकालीन उद्देश आहे, असा विश्लेषकांचा ठाम निष्कर्ष आहे.
हिंद महासागरात तुर्कीचा वाढता हस्तक्षेप
एन. सत्य मूर्ती या तज्ज्ञाच्या मतानुसार, तुर्की गेल्या दोन दशकांपासून हिंद महासागर क्षेत्रात (IOR) कायमस्वरूपी उपस्थिती निर्माण करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. चीनसारखे महासत्ता बनण्याच्या मार्गावर तुर्की सध्या पाकिस्तान, मालदीव यांसारख्या देशांशी सैनिकी-सामरिक सहकार्य वाढवून आपल्या प्रभावाचे वर्तुळ विस्तारत आहे.
चीनने श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर ९९ वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे आणि पाकिस्तानातील ग्वादर बंदरातही आपली उपस्थिती प्रस्थापित केली आहे. अमेरिका आधीच डिएगो गार्सिया या लष्करी तळाद्वारे हिंद महासागरात बळकट आहे. अशा परिस्थितीत तुर्कीही मालदीवसारख्या देशांतून आपला प्रवेशद्वार उघडत आहे, आणि हीच गोष्ट भारतासाठी चिंतेची ठरत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 400 kg enriched uranium missing : ‘इराणचे 400 किलो युरेनियम…’ अखेर उपराष्ट्रपती व्हान्स यांनी कबूल केलं सत्य
तुर्कीचे मालदीव धोरण आणि पाकिस्तानसंबंधी अजेंडा
तुर्कीने मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणावर सामरिक गुंतवणूक केली आहे. राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांचा तुर्कीशी असलेला जवळचा संबंध आणि ड्रोन्स, युद्धनौका, अन्नपुरवठा पॅकेज देऊन तुर्कीने मालदीवला आकर्षित केले आहे. यामागे तुर्कीचा उद्देश स्पष्ट आहे. हिंद महासागरात थेट प्रभाव प्रस्थापित करणे. पाकिस्तानच्या माध्यमातून तुर्की काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि भारतीय भूमिकेला आव्हान देतो. मात्र, हे संबंध केवळ धार्मिक नसून भू-राजकीय सामरिक समीकरणांचा भाग आहेत. तुर्की आणि पाकिस्तान यांचे संरक्षण सहकार्य CENTOपासून सुरू आहे आणि ते आता नव्या जागतिक वास्तवात सामर्थ्यशाली रूप घेत आहे.
Turkish and Pakistani navies held joint exercises in the Eastern Mediterranean 🇵🇰🇹🇷
Pakistani Navy corvette, namely the PNS Babur, which is one of the corvettes of the Turkish MILGEM project built by the Turkish shipyard for the Islamabad Navy, is currently sailing in the… pic.twitter.com/tvDJjwL7us
— Global Defense Insight (@Defense_Talks) June 12, 2024
credit : social media
तुर्कीचे महत्त्वाकांक्षी भविष्यदृष्टी प्रकल्प
तुर्कीचा २०२३ ‘व्हिजन प्रोजेक्ट’ आणि २०५३ ‘इस्तंबूल विजय शताब्दी’ ही केवळ आतल्या राष्ट्रवादाची नाही तर नव्या साम्राज्यवादाची रणनीती आहे. भारताने याकडे केवळ इस्लामी लेन्सने पाहिल्यास ते धोरणात्मक चूक ठरू शकते, असं सत्य मूर्तींचं मत आहे.
भारताची भूमिका आणि धोरणात्मक प्रतिसाद
भारताने मालदीवबरोबरचे संबंध सावरले असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालदीव भेटीची शक्यता आहे. तुर्कीच्या उपस्थितीला तोलण्यासाठी भारताला केवळ राजनैतिक किंवा आर्थिक नव्हे, तर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामरिक पकडही अधिक मजबूत करावी लागेल. एन. सत्य मूर्ती सूचित करतात की, तुर्कीवर विश्वास न ठेवता त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. हिंद महासागरात भारताची प्राथमिकता, पकड आणि रणनीती ठोस असली पाहिजे, अन्यथा भविष्यात भारताला याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran–Israel war : ‘स्मशान शांतता अन् ताजे व्रण…’ इस्रायलमध्ये ३० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त, पाहा Recent Update
भारताची भूमिका
तुर्की आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध केवळ इस्लामिक आधारावर बघणं म्हणजे वास्तव झाकण्यासारखं आहे. तुर्की हिंद महासागरात नवा सापळा रचत आहे आणि भारतासाठी तो एक मोठा भू-राजकीय इशारा आहे. यासाठी भारताला शहाणपण, संयम आणि बळकट रणनीती यांचा संगम साधून पुढील धोरण आखावं लागेल.