Uganda confirms Ebola outbreak
कंपाला: युगांडाच्या राजधानी कंपालामध्ये इबोला विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून सरकारने त्वरीत उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सरकारने मुलागो नॅशनल रेफरल हॉस्पिटलमध्ये एक विशेष विलगीकरण आणि उपचार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रात 84 लोकांसाठी व्यवस्था करण्यात आली असून, याची निर्मिती जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने करण्यात आली आहे.
आपत्कालीन वैद्यकीय टीम तैनात
युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी हेनरी क्योबे बोसा यांनी सांगितले आहे की, हे केंद्र सूडान इबोला व्हायरस रोगा(SVD) चे संशयित आणि पुष्टी झालेल्या रुग्णांचे व्यवस्थापन करेल. याशिवाय, सरकारने एक राष्ट्रीय आपत्कालीन वैद्यकीय टीम देखील तैनात केली आहे असून या टीमला संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे.
ही टीम रुग्णांची काळजी घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.याशिवाय, एमबाले येथेही एक वेगळे विलगीकरण केंद्र उभारुन लवकरच सुरु करण्यात येणार आहे. प्रशासनाने युगांडाच्या नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले असून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले आहे.
इबोला प्रादुर्भाव आणि सरकारचे उपाय
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात 32 वर्षीय महिला रुग्णेचा या आजारामुळे मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 45 जणांची ओळक पटवली असून, त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, युगांडामध्ये यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये इबोला विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता.
त्यानंतर या विषाणुला जानेवारी 2023 मध्ये नियंत्रणात आणण्यात आले. WHO च्या आकडेवारीनुसार, 2022-23 दरम्यान 164 लोकांना या विषाणुचा संसर्ग झाला होता, आणि त्यापैकी 77 जणांचा मृत्यू झाला होता. 2023 नंतर आता हा विषाणु पुन्हा एकदा वाढू लागला आहे.
इबोला विषाणूची लक्षणे आणि प्रसार
इबोला हा एक दुर्मिळ, पण अत्यंत घातक विषाणू आहे. हा संक्रमित प्राणी किंवा मनुष्याच्या शरीरातील द्रवांच्या संपर्कामुळे पसरतो. आफ्रिकेतील काही भागांमध्ये हा विषाणू प्रादुर्भावाच्या रूपाने आढळतो. या आजाराची सुरुवातीची लक्षणे फ्लूसारखी असतात—ताप, डोकेदुखी आणि अंगावर लालसर चट्टे येणे. मात्र, हा विषाणू झपाट्याने गंभीर स्वरूप धारण करू शकतो, यामुळे उलटी, रक्तस्राव आणि तंत्रिका तंत्राशी संबंधित त्रास निर्माण होतो.