UK bans Sanex ad for portraying dark skin as inferior
आजच्या काळात सौंदर्याविषयीच्या कल्पना, त्वचेचा रंग आणि त्यावर आधारित समाजातील दृष्टिकोन याविषयी अनेकदा चर्चा रंगतात. त्वचा गोरी असली तरच ती सुंदर मानावी आणि काळी असली तर ती समस्या आहे, अशी दृष्टीकोनाची साखळी अजूनही जगभरात अनेक ठिकाणी दिसते. पण यावेळी हा मुद्दा एका जाहिरातीमुळे ब्रिटनमध्ये चांगलाच गाजला. ब्रिटनच्या जाहिरात मानक प्राधिकरणाने (ASA) कोलगेट-पामोलिव्हच्या सॅनेक्स शॉवर जेलच्या जाहिरातीवर बंदी घातली आहे. या जाहिरातीत त्वचेच्या रंगाबाबत असा संदेश जातो की काळी त्वचा म्हणजे समस्याप्रधान, तर गोरी त्वचा म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि श्रेष्ठ. हाच मुद्दा वर्णद्वेषी ठरतो, असे मानत ASA ने कारवाई केली.
जून महिन्यात ब्रिटनमध्ये ही जाहिरात प्रसारित झाली. त्यात एक काळी महिला आपल्या शरीरावर लाल डाग आणि खरुजसारख्या खुणा दाखवत होती. त्याचवेळी दुसऱ्या एका महिलेची त्वचा चिखल आणि भेगांनी झाकलेली दाखवली होती. पार्श्वभूमीवर आवाज येतो “ज्यांची त्वचा दिवसरात्र खाजवते, पाण्यानेही कोरडी पडते, त्यांच्यासाठी…”
यानंतर लगेच दृश्य बदलते. एक गोरी महिला शॉवरमध्ये सॅनेक्स स्किन थेरपी वापरताना दिसते. व्हॉइसओव्हर म्हणते “आता मिळवा २४ तास हायड्रेशनचा अनुभव. नवीन अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्ससह आंघोळ म्हणजे आरामाचा सोपा उपाय.” शेवटी जाहिरातीवर टॅगलाइन झळकते “आंघोळीतून मिळवा हायड्रेशन, इतकं सोपं असू शकतं.” पहिल्या भागात काळ्या त्वचेचं चित्रण ‘प्रॉब्लेम’ म्हणून केलं गेलं आणि दुसऱ्या भागात गोऱ्या त्वचेचं दर्शन ‘उपाय’ म्हणून दिलं गेल्यामुळे, ही तुलना वर्णद्वेषी असल्याचं स्पष्ट झालं.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल
ही जाहिरात कोलगेट-पामोलिव्हची होती. कंपनीने ASA च्या बंदीवर नाराजी व्यक्त केली. त्यांचा दावा होता की जाहिरातीचा उद्देश ‘before and after effect’ दाखवण्याचा होता. मॉडेल्स कोणत्याही रंगाच्या असोत, उत्पादन सर्वांसाठी योग्य आहे, हे दाखवायचा हेतू होता. त्वचेच्या रंगावर कोणताही भर दिलेला नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे. जाहिरातींना टीव्हीवर प्रसारित करण्याआधी मंजुरी देणाऱ्या क्लिअरकास्ट या संस्थेनेही कंपनीच्या बाजूने मत दिले. त्यांचा युक्तिवाद असा होता की ही जाहिरात वंशवाद नव्हे तर उत्पादनाची ‘इन्क्लुसिव्हिटी’ दाखवते.
तथापि, ASA ने सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. त्यांच्या मते “जाहिरातीतील तुलना थेट नकारात्मक अर्थ निर्माण करते. काळी त्वचा ही समस्या आहे आणि गोरी त्वचा हवीहवीशी आहे, असा संदेश नकळतपणे पोहोचतो.” ASA ने हेही मान्य केलं की कंपनीला कदाचित असा संदेश द्यायचा नव्हता. पण दृश्यांच्या मांडणीतून असा अर्थ निघतो आणि त्यामुळे वर्णद्वेषी रूढी आणखी बळकट होतात. म्हणूनच जाहिरात सध्याच्या स्वरूपात पुन्हा दाखवू नये, असा आदेश देण्यात आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IRIGC-TEC Meeting : जागतिक शक्तींना भारत-रशियाचा नवा मेसेज! जयशंकर-मंटुरोव्ह यांची ‘अभूतपूर्व करारा’वर स्वाक्षरी
ही घटना फक्त एका उत्पादनाच्या जाहिरातीपुरती मर्यादित नाही. यामुळे समाजातील एक खोलवर रुजलेली मानसिकता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे “सुंदरतेचं परिमाण नेहमीच गोरेपण का?” भारत असो वा पाश्चात्य देश, त्वचेच्या रंगावर आधारित पूर्वग्रह आजही जिवंत आहेत. अनेक वर्षांपासून ‘फेअरनेस क्रीम’, ‘स्किन व्हाइटनिंग प्रॉडक्ट्स’ यांची जाहिरात आपल्याला हाच संदेश देत आली की गोरेपणा म्हणजे यश, आत्मविश्वास आणि सौंदर्य. यामुळेच काळ्या त्वचेबद्दल हीनगंड समाजात पसरतो. ब्रिटनमध्ये या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली असली तरी, यामागचा मोठा प्रश्न मात्र जागतिक आहे. सौंदर्य म्हणजे आत्मविश्वास, निरोगीपणा आणि स्वतःवर प्रेम करणे. त्वचेचा रंग कधीच त्याचं परिमाण ठरू शकत नाही.