US and India concerned about China's 'FOBS' project
बीजिंग/वॉशिंग्टन – पारंपरिक, जमीन, आकाश आणि पाण्यावरून हल्ले करण्यास सक्षम क्षेपणास्त्रांनंतर आता चीनने अंतराळातून थेट अणुहल्ला करण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर विभागाने (DIA) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की, चीन ‘फ्रॅक्शनल ऑर्बिटल बॉम्बार्डमेंट सिस्टम’ (FOBS) नावाच्या अत्याधुनिक प्रणालीच्या माध्यमातून थेट पृथ्वीच्या कक्षेतून क्षणात अणुबॉम्ब टाकू शकेल. हे तंत्रज्ञान अमेरिकेसह भारतासाठीही गंभीर धोका बनू शकते.
FOBS प्रणालीची मुळे शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनने तयार केलेल्या R-36O क्षेपणास्त्रांमध्ये आहेत. हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या रडारवर न सापडण्यासाठी दक्षिण ध्रुव मार्गाने उड्डाण करीत असे. त्यानंतर हे तंत्रज्ञान सोव्हिएत युनियनने नष्ट केले. मात्र, चीनने याचे पुनरुज्जीवन करत, हायपरसॉनिक ग्लाइड व्हेईकल (HGV) या अत्याधुनिक यंत्रणेशी एकत्र करून अधिक घातक रूप दिले आहे.
२०२१ मध्ये चीनने ‘लॉन्ग मार्च 2C’ रॉकेटमधून FOBS-HGV यंत्रणा यशस्वीपणे चाचणीसाठी प्रक्षेपित केली होती. या प्रक्षेपणानंतर, ग्लाइड व्हेईकलने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली आणि नंतर हायपरसॉनिक वेगाने लक्ष्याकडे झेपावले. या चाचणीमुळे पेंटागॉनमध्ये खळबळ उडाली होती. अमेरिका आणि जगभरातील कोणतीही संरक्षण प्रणाली FOBSचा वेग, दिशा व क्षेपणास्त्रांचा मागोवा घेऊ शकत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोणता डाव खेळतेय अमेरिका? पहलगाम हल्ल्यापूर्वी ट्रम्प आणि पाक लष्करप्रमुखांमध्ये झाली होती ‘Crypto Deal’
DIA च्या अंदाजानुसार, चीन २०३५ पर्यंत FOBS प्रणालीचे किमान ६० युनिट्स आणि ७०० अणुयुक्त आयसीबीएम क्षेपणास्त्रे तयार करू शकतो. पाणबुड्यांमधून प्रक्षेपणक्षम क्षेपणास्त्रांची संख्या १३२ वर पोहोचू शकते. याच्या तुलनेत रशियाकडे त्यावेळी १२ FOBS आणि ४०० आयसीबीएम असतील. भारतसारख्या शेजारी देशांवरही याचा प्रत्यक्ष धोका निर्माण होतो आहे.
या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ‘गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स शील्ड’ प्रकल्पाची घोषणा केली आहे. हा प्रकल्प २५ अब्ज डॉलर्सच्या प्रारंभिक निधीसह सुरू करण्यात आला आहे आणि अंतिम खर्च १०० अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे. या प्रकल्पामध्ये एलोन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी तसेच अमेरिकेच्या प्रमुख संरक्षण कंपन्यांचा सहभाग आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : POK वाचवण्यासाठी पाकिस्तानची ‘नवी चाल’; भारतावर दबाव आणण्यासाठी चीनला खेचले मैदानात
FOBS ही एक अशी प्रणाली आहे जी पारंपरिक क्षेपणास्त्रांच्या तुलनेत अधिक वेगवान, धोरणात्मक आणि अचूक आहे. चीनकडून या प्रणालीचा प्रसार होणे म्हणजे जागतिक शक्ती संतुलनाला मोठे आव्हान देणारी बाब ठरू शकते. अमेरिका, भारत व अन्य महत्त्वाचे देश यावर योग्य ती जवाबदारीने आणि तांत्रिक प्रगतीने उत्तर देणार का, हे आगामी दशकात स्पष्ट होईल.