US-China Tarrif War China imposed 125% percent tariff on America from today
वॉशिंग्टन: वेगवेगळ्या देशांवर टॅरिफ लावल्यानंतर त्याला स्थगिती दिल्याने टीकेचे धनी ठरलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनने पुन्हा एक धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी अनेक देशांवरील आयातशुल्काला स्थगिती दिली असली तरी चीनवरील आयातशुल्क थेट १२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे संकेत दिले. त्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील ‘टॅरिफ वॉर’ आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आधी १०४ टक्के न आयातशुल्काची घोषणा केली आणि त्यानंतर चीननेही जोरदार प्रत्युत्तर देत अमेरिकेवर ८४ टक्के वाढीव कर लादला.
यानंतर अमेरिकेने चीनवरील आयातशुल्क थेट १२५ टक्क्यांपर्यंत वाढवले. त्यानंतर गुरुवारी, व्हाईट हाऊसने सांगितले की ते फेंटानिलवर २०% कर जोडत आहे, जो मार्च २०२५ मध्ये लागू होईल. यानंतर आता चीन शनिवारपासून अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्के कर लादणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनुसार, चीनच्या अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले की, बीजिंग शनिवारपासून अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्के कर लादणार आहे. हा कर आधी जाहीर केलेल्या ८४ टक्के करांपेक्षा जास्त असेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिका-चीन Tariff War घमासान; कोण घेणार माघार अन् वरचढ?
एकतर्फी निर्णय चीनवर अमेरिकेने लादलेले अतिरिक्त आयातशुल्क हे आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक व्यापार नियमांचे उल्लंघन आहे. हे निर्णय पूर्णपणे एकतर्फी आणि जबरदस्तीचे आहेत, असे चीनच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगातील ७० देशांवर आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाचे परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाले आणि त्यानंतर जगभरात मोठा गदारोळ निर्माण झाला.
चीनने अमेरिकेच्या दादागिरीविरोधात एकत्र येऊन काम करायला हवे, असे आवाहन युरोपीयन युनियनला केले आहे. याशिवाय, अमेरिका कसलाही विचार न करता याच पद्धतीने पावले उचलत राहिल्यास आपणही जशाच तसे उत्तर देण्यासाठी तयार आहोत. व्यापारासंदर्भात अमेरिकेचा सामना करण्यासाठी युरोपीय संघाने चीनसोबत काम करायला हवे, असे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.
दरम्यान ट्रम्प यांच्या नव्या धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्था ढवळून निघाली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम दिसून येत आहे. तसेच अमेरिकन डॉलरची किंमत युरोच्या तुलनेन नीचांकी पातळीवर घसरली आहे. तीन वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. शिवाय, जागतिक बाजापेठांमध्ये देखील अस्थिरता निर्माण झाली आहे. तसेच ट्रम्प चीनवर लादलेल्या कराचा देखील चीन योग्य प्रत्युत्तर दिले आहे. चीनने तीव्र प्रतिक्रिया देत युरोपसोबत संयुक्त आर्थिक लढ्याचा इशारा दिला आहे.