
US launches Project Firewall to protect Americas worker
Donald Trump on H-1B Visa : वॉशिंग्टन : काही दिवसांपूर्वीच ट्रम्प सरकारने H-1B व्हिसाच्या फीमध्ये भरमसाठ वाढ केली होती. इतर देशातील नागरिकांना अमेरिकेत काम करण्यासाठी या व्हिसाची आवश्यकता असते. आता ट्रम्प सरकारच्या लेबर डिपार्टमेंटने स्थानिक कंपन्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत एक्स प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओही शेअर केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; कारण काय तर…
कंपन्यांनी H-1B व्हिसाचा गैरवापर केला, आणि अमेरिकन तरुणांचे ‘अमेरिकन ड्रीम’ चोरले असा आरोप या व्हिडिओमधून करण्यात आला आहे. बाहेरच्या देशातील नागरिकांना चुकीच्या पद्धतीने आणि कमी पगारावर नोकऱ्या दिल्या गेल्या, त्यामुळे अमेरिकेतील तरुणांच्या संधी हिरावल्या गेल्या असेही त्यांनी म्हटले. यामध्ये केवळ कंपन्यांनाच नाही, तर नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे, ज्यांनी कंपन्यांना असे करण्याची मुभा दिली. तसेच भारतावरही गंभीर आरोप करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या मते या व्हिसाचा फायदा घेणारे लोक सर्वात जास्त लाभ घेतात.
प्रोजेक्ट फायरवॉल
या व्हिडिओच्या सुरुवातीला १९५०च्या दशकातील अमेरिकन कुटुंब, घरे यांच्या क्लिप्स दाखवण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘प्रोजेक्ट फायरवॉल’चा उल्लेख केला आहे. या प्रोजेक्ट फायरवॉलच्या माध्यमातून आम्ही कंपन्यांना H-1B व्हिसाच्या चुकीच्या वापरासाठी जबाबदार ठरवत आहोत, असे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ट्रम्प सरकारच्या लेबर डिपार्टमेंटने यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातच या मोहिमेची सुरूवात केली होती. H-1B व्हिसाच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठीचे ही विशेष मोहिम आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून ट्रम्प सरकार देशातील नागरिकांचे, आणि विशेषतः युवकांचे ‘अमेरिकन ड्रीम’ परत आणणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन कामगारांचे अधिकार, वेतन आणि नोकरीतील संधी वाचवणे हे याचे उद्दिष्ट आहे. अमेरिकेतील कंपन्या नोकरी देताना अमेरिकी नागरिकांना प्राथमिकता देत आहे की नाही, हे यामध्ये तपासण्यात येणार आहे. यामध्ये काही गैरप्रकार आढळल्यास कंपन्यांना मोठा दंड भरावा लागणार असल्याचे ट्रम्प सरकारने स्पष्ट केले आहे.
Young Americans have had the American Dream stolen from them, as jobs have been replaced by foreign workers due to rampant abuse of the H-1B visa. Under @POTUS and @SecretaryLCD’s leadership, we’re holding companies accountable for their abuse—and recapturing the American Dream… pic.twitter.com/x3lqJS9CyG — U.S. Department of Labor (@USDOL) October 30, 2025
काय आहे ‘अमेरिकन ड्रीम’?
अमेरिकेच्या संस्थापकांनी १७७६ मध्ये देशातील सर्व नागरिकांना जगण्याचा, संधीचा आणि खुश राहण्याचा समान अधिकार असल्याचे म्हटले होते. याच गोष्टीचा उल्लेख १९३१ साली जेम्स ॲडम्स या लेखकाने आपल्या पुस्तकात ‘अमेरिकन ड्रीम’ असा केला. यामध्ये सांगण्यात आले आहे की, अमेरिकन ड्रीम म्हणजे फक्त जास्त पैसे कमावणे, वा गाडी घेणे नाही. हे एक असे स्वप्न आहे ज्यात सर्वांना पुढे जाण्याची समान संधी मिळेल. केवळ विशिष्ट परिवारात जन्म घेतल्यामुळे नव्हे, तर आपल्या मेहनत आणि योग्यतेनुसार सन्मान मिळेल.
ट्रम्प सरकार सध्या ‘अमेरिकन ड्रीम’ हीच टॅगलाईन घेऊन जनतेला आपलेसे करू पाहतेय. अमेरिकेतील नागरिकांच्या संधी कंपन्यांनी हिरावल्या आहेत, असे म्हणत ट्रम्प यांनी H-1B व्हिसाची फीदेखील वाढवली आहे. अमेरिकेतील H-1B व्हिसा होल्डर्सपैकी 72 टक्के भारतीय आहेत. सध्या या व्हिसासाठी तब्बल ८८ लाख रुपये एवढी फी भरावी लागत आहे, जी पूर्वी पाच ते सात लाख रुपये एवढी होती. कंपन्यांनी विदेशी कामगारांऐवजी स्थानिकांना संधी द्यावी या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. मात्र याचा फटका लाखो भारतीयांना बसत आहे.