अमेरिकेत 18% वाढली बेघर लोकांची संख्या; HUD च्या अहवालातून कारणंही स्पष्ट
वॉश्गिंटन: अमेरिकेत या वर्षी बेघर लोकांच्या संख्येत 18.1% वाढ झाल्याची माहिती यूएस डिपार्टमेंट ऑफ हाऊसिंग अँड अर्बनच्या (HUD) अधिकाऱ्यांनी 27 डिसेंबर 2024 रोजी दिली. यामागचे कारण सांगताना अधिकाऱ्यांनी म्हटले की, किफायतशीर घरे उपलब्ध नसणे, विनाशकारी नैसर्गिक आपत्ती, आणि देशाच्या विविध भागांमध्ये स्थलांतरितांची वाढती संख्या ही या वाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
7,70,000 हून अधिक लोक बेघर
अमेरिकी आवास आणि शहरी विकास विभागाने (HUD) जानेवारीत देशभर केलेल्या गणनेतून ही माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, अमेरिकेत 7,70,000 हून अधिक लोक बेघर आहेत. यामध्ये त्यांचा समावेश नाही जे मित्र-परिवाराकडे आश्रय घेत आहेत. याआधी 2023 मध्येहीअमेरिकेत बेघरांच्या संख्येत 12% वाढ झाली होती. HUD ने यामागचे कारण सांगताना म्हटले आहे की, जास्त घरभाडे आणि महामारी-नंतरची आर्थिक मदत संपुष्टात आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली असल्याचे सांगितले.
HUD प्रमुखांचे मत
HUD चे प्रमुख एड्रिएन टॉडमॅन यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी या निवेदनात सांगितले की, “कोणत्याही अमेरिकन नागरिकाला बेघर होण्याचा सामना करावा लागू नये, यासाठी बाइडेन-हॅरिस प्रशासन बांधिल आहे.” त्यांनी हेही नमूद केले की बेघर होण्यापासून बचाव करण्यासाठी आणि ते थांबवण्यासाठी पुराव्यांवर आधारित उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रवासामुळे बेघर कुटूंबाच्या संख्येत वाढ
तसेच, प्रवासामुळे काही मोठ्या शहरांमध्ये बेघर कुटुंबांची संख्या लक्षणीय वाढली असल्याचेही HUD च्या प्रमुखांनी म्हटले आहे. HUD च्या अहवालानुसार, डेनवर, शिकागो, आणि न्यूयॉर्क शहर यांसारख्या 13 समुदायांमध्ये कुटुंबांमध्ये बेघर होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. इतर 373 समुदायांमध्ये ही वाढ 8% पेक्षा कमी आहे.
बालकांवरही गंभीर परिणाम
2024 मध्ये एका रात्रीत 1,50,000 हून अधिक मुलांना बेघर राहण्याचा अनुभव आला, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत 33% अधिक होता. ही आकडेवारी अशा वेळी समोर आली आहे जेव्हा अनेक समुदाय बेघरांच्या समस्येसाठी कठोर पावले उचलत आहेत. बेघर होण्याचे वाढते प्रमाण आणि त्याचे कारणे अमेरिकेतील आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक आव्हानांचे गंभीर चित्र उभे करत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारी स्तरावर आणि स्थानिक समुदायांत मोठ्या प्रमाणावर समन्वय आवश्यक आहे. यामुळे अमेरिकेने लवकरात लवकर यावर तोडगा काढणे महत्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.