US President to visit Pakistan after 19 years Donald Trump's possible visit sparks debate
Donald Trump Pakistan visit : जगभरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठ्या उलथापालथी घडवणारे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पाकिस्तानी माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, ट्रम्प सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानचा दौरा करू शकतात. हा दौरा खरा ठरला, तर सुमारे १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या अमेरिकन अध्यक्षाचा पाकिस्तान दौरा ठरणार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये नवे पर्व सुरू होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेला भेट दिली होती. त्या भेटीदरम्यान, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतरच, ट्रम्प पाकिस्तानला भेट देतील अशी शक्यता पाकिस्तानी मीडिया सातत्याने व्यक्त करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प सप्टेंबरमध्ये इस्लामाबादमध्ये येऊ शकतात. या दाव्यांवर अद्यापही व्हाईट हाऊस किंवा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, जनतेमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये या दौऱ्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मेलानिया ट्रम्प युक्रेनची गुप्तहेर? नेटवर उमटल्या वादळी प्रतिक्रिया, Trump-Putin भेटीनंतर चर्चांचा उधाण
जर ट्रम्प यांचा दौरा खरा ठरला, तर तो ऐतिहासिक ठरणार आहे. कारण, १९ वर्षांपूर्वी २००६ मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्यांच्याआधी २००० मध्ये बिल क्लिंटन यांनीही पाकिस्तान दौरा केला होता, मात्र ती भेट काही तासांचीच होती. त्यामुळे गेल्या दोन दशकांत अमेरिकन अध्यक्षांनी पाकिस्तानला फारसं महत्त्व दिलं नव्हतं. हा दौरा केवळ राजकीय नव्हे, तर भू-राजकीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिका, चीन आणि भारत यांच्यातील नाजूक संतुलन बघता, ट्रम्प यांची पाकिस्तान भेट जागतिक राजकारणात नवा मोड आणू शकते.
पाकिस्तान आणि चीन यांचे संबंध नेहमीच घट्ट राहिले आहेत. चीनची ‘बेल्ट अँड रोड’ योजना असो किंवा ग्वादार बंदर प्रकल्प – पाकिस्तानमध्ये चीनचे आर्थिक आणि सामरिक हितसंबंध खोलवर रुजले आहेत. मात्र, अलीकडे पाकिस्तान अमेरिकेकडेही मैत्रीचा हात पुढे करत आहे.
असीम मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्याने याला अधिक बळ दिलं आहे. अमेरिकेने त्यांचे जोरदार स्वागत केलं आणि दोन्ही देशांमध्ये संरक्षण, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याबाबत चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा दौरा केवळ ‘शिष्टाचार भेट’ न ठरता, धोरणात्मक संदेश देणारा ठरू शकतो.
ट्रम्प यांनी यापूर्वी भारत-पाकिस्तान तणावावर देखील आपलं मत व्यक्त केलं होतं. विशेषतः पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईनंतर त्यांनी दावा केला होता की त्यांच्या मध्यस्थीमुळेच दोन्ही देशांमध्ये युद्ध टळले. त्यांनी स्वतःला शांतता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता म्हणून मांडले होते. त्यांच्या संभाव्य पाकिस्तान दौऱ्यातही काश्मीर प्रश्न, सीमावाद आणि दहशतवादविरोधी भूमिका या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Fentanyl Crisis US : ‘हे’ औषध नाही, ही आहे अमेरिकेच्या विनाशाची सुरुवात; US-China मध्ये नव्या संघर्षाची चिन्हं
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तान दौरा केवळ राजकीय भेट नसून, जागतिक राजकारणात मोठा संदेश देणारा ठरू शकतो. भारत, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंध, चीनचा दबदबा, आणि दक्षिण आशियातील बदलते समीकरण या सगळ्या घटकांमुळे ट्रम्प यांची इस्लामाबाद भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अनेक अनुत्तरित प्रश्नांमध्ये ट्रम्प येणार की नाही? त्यांनी पाकिस्तानसाठी कोणती भूमिका आखली आहे? आणि या दौऱ्याचा भारतावर काय परिणाम होईल? यांची उत्तरे मिळण्याची प्रतीक्षा संपूर्ण जगाला लागली आहे.