मेलानिया ट्रम्प युक्रेनची गुप्तहेर? नेटवर उमटल्या वादळी प्रतिक्रिया, ट्रम्प-पुतिन भेटीनंतर चर्चांचा उधाण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Agent Melania Trumpenko : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. यावेळी कारण अधिक गहिरे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित आहे. सोशल मीडियावर मेलानिया ट्रम्प यांना थेट “युक्रेनची गुप्तहेर” म्हटले जात आहे. या चर्चेला उधाण आले ते ट्रम्प यांनी नुकत्याच नाटो महासचिवांसोबतच्या बैठकीत केलेल्या एका वक्तव्यामुळे.
व्हाईट हाऊसमध्ये नाटोचे महासचिव मार्क रूट यांच्याशी झालेल्या भेटीत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, व्लादिमीर (पुतिन) यांच्याशी माझे संभाषण खूप चांगले होते. मी घरी गेलो आणि फर्स्ट लेडीला सांगितले की, आमची चर्चाच खूप सकारात्मक झाली. त्यावर मेलानियाने मला सांगितले की खरंच? कारण दुसऱ्याच शहरावर हल्ला झाला आहे.
या एका संवादामुळे अनेकांचे लक्ष मेलानिया ट्रम्प यांच्या भूमिकेकडे वेधले गेले. काही सोशल मीडिया युजर्सनी तर थेट त्यांना युक्रेनचा गुप्तहेर घोषित करत, त्यांचे नावच बदलून “मेलानिया ट्रम्पेंको” असे लिहायला सुरुवात केली आहे. ‘एन्को’ हे प्रत्यय युक्रेनियन आडनावांत वापरले जाते आणि त्याचा अर्थ होतो “वंशजाचा मुलगा”.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Fentanyl Crisis US : ‘हे’ औषध नाही, ही आहे अमेरिकेच्या विनाशाची सुरुवात; US-China मध्ये नव्या संघर्षाची चिन्हं
“मेलानिया ट्रम्पेंको”, “Ukrainian First Lady” यांसारखे शब्द ट्विटर, रेडिट आणि फेसबुकवर ट्रेंड होत आहेत. काही युजर्सनी तर थेट विचारले आहे – ट्रम्प यांच्या रशिया धोरणात इतका मोठा बदल अचानक कसा झाला? यामागे मेलानिया ट्रम्प यांची भूमिका आहे का? हे सगळं गमतीने सुरू झालं असलं तरी काही राजकीय निरीक्षकांनी मात्र यामध्ये गांभीर्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प यांनी पुतिन यांच्या दुटप्पी धोरणांविषयी आपली मतं बदलली आणि त्याचा संदर्भ पत्नीच्या निरीक्षणांशी जोडला, हे अनेकांसाठी महत्त्वाचं वाटत आहे.
मेलानिया ट्रम्प स्वतः युक्रेनबद्दल सहानुभूती व्यक्त करत आल्या आहेत. २०२२ मध्ये जेव्हा रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला होता, तेव्हा मेलानियाने सोशल मीडियावरून युक्रेनियन नागरिकांसाठी मदतीचे आवाहन केले होते. तिने अमेरिकन रेड क्रॉससाठी निधी गोळा करण्याचे आवाहन करत लिहिले होते की, “निरपराध नागरिकांना होणारा त्रास हृदयद्रावक आणि असह्य आहे.” मेलानिया यांचा जन्म स्लोव्हेनियामध्ये झाला, जे पूर्वीच्या युगोस्लाव्हियाचा भाग होता. १९९१ मध्ये स्लोव्हेनियाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यामुळेच तिच्या मनात रशियन आक्रमकतेविरोधात खोल भावना असल्याचे मानले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ना मुस्लिम ना ख्रिश्चन, मग कोण आहेत ड्रुझ? 8 लाख लोकसंख्या असलेला ‘गुप्त’ धर्म, ज्यासाठी इस्रायलने चढवला सीरियावर हल्ला
ट्रम्प-पुतिन संबंध आणि त्यामध्ये मेलानिया यांची स्पष्ट भूमिका यामुळे एक वेगळाच राजकीय दृष्टिकोन समोर आला आहे. अनेकांचे असेही म्हणणे आहे की, मेलानियाने ट्रम्प यांचे मन वळवले आणि रशियाविषयी त्यांच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणला. जरी या चर्चांमध्ये कोणतेही अधिकृत सत्य नसले, तरी सोशल मीडियावर याबाबतचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय भाष्यकारांचं म्हणणं आहे की, ही चर्चा अमेरिकेच्या आगामी निवडणुकांमध्येही महत्त्वाची ठरू शकते.