
US Deploys Weapons in Space Space War World War 3 US Space Force
जमीन, पाणी आणि आकाशात हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या महासत्तांमधील संघर्षाने आता अंतराळाच्या अनंत सीमांमध्ये प्रवेश केला आहे. अमेरिकेने (US Space Force) पृथ्वीच्या कक्षेमध्ये थेट लष्करी शस्त्रास्त्रे तैनात केल्याची अधिकृतपणे सार्वजनिक पुष्टी केली आहे. वॉशिंग्टनकडून अंतराळ-आधारित आक्रमक आणि बचावात्मक लष्करी क्षमतांची दिलेली ही पहिलीच सार्वजनिक कबुली मानली जात आहे. चीन आणि रशियाच्या अंतराळातील वाढत्या आक्रमक हालचालींना आणि उपग्रहविरोधी तंत्रज्ञानाला रोखण्यासाठी अमेरिकेने हे मोठे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या खळबळजनक खुलाशानंतर जागतिक सुरक्षेबाबत काम करणाऱ्या तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून, अंतराळ हे आता केवळ मानवी संशोधनाचे केंद्र राहिले नसून ते भविष्यातील महायुद्धाचे नवीन रणांगण बनले आहे, असा गंभीर इशारा दिला आहे.
सोमवारी एका विशेष कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना अमेरिकेचे हवाई दल सचिव ट्रॉय मेनेक यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेला अंतराळात निर्माण होणाऱ्या अत्यंत आव्हानात्मक आणि “बदलत्या धोक्यांना” तोंड देण्यासाठी प्रत्येक क्षणी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने कक्षेत कोणत्या प्रकारची प्राणघातक शस्त्रे तैनात केली आहेत, त्यांची मारा करण्याची क्षमता किती आहे किंवा ती कधी स्थापित करण्यात आली, याविषयीचा गुप्त तपशील उघड करण्यास नकार दिला आहे.
अमेरिकेच्या सशस्त्र दलांची अत्यंत आधुनिक आणि विशेष शाखा असलेल्या ‘यूएस स्पेस फोर्स’ने (US Space Force) देखील पृथ्वीच्या कक्षेत ही लष्करी शस्त्रे उपस्थित असल्याचे अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. स्पेस फोर्सने या अत्याधुनिक शस्त्रांचे वर्णन ‘ऑर्बिटल स्पेस CONTROL वेपन्स’ (Orbital Space Control Weapons) असे केले आहे. त्यांच्या मते, ही प्रणाली अमेरिकन सैन्य आणि त्यांच्या सहयोगी देशांच्या तळांचे शत्रूच्या कोणत्याही संभाव्य आक्रमणापासून रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश
एएफपी (AFP) या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्पेस फोर्सच्या एका मुख्य प्रवक्त्याने सांगितले की, “अमेरिकेकडे अशी कक्षीय अंतराळ नियंत्रण शस्त्रे उपलब्ध आहेत, जी संयुक्त दलांचे शत्रूच्या आक्रमणापासून रक्षण करू शकतात. अंतराळ नियंत्रणामध्ये अंतराळ क्षेत्राला आव्हान देणे आणि त्यावर पूर्ण नियंत्रण मिळवणे यासाठी आवश्यक असलेल्या सर्व मोहिमांचा समावेश होतो. शत्रूच्या लष्करी क्षमतांवर थेट परिणाम करण्यासाठी यात गतिमान (Kinetic) आणि अ-गतिमान (Non-Kinetic) अशा दोन्ही अत्याधुनिक पद्धतींचा वापर केला जातो.” या क्षमतेचा वापर आक्रमक चाली आणि बचावात्मक संरक्षण अशा दोन्ही उद्दिष्टांसाठी केला जाऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अमेरिकेने अंतराळात शस्त्रे तैनात करण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. गेल्या काही वर्षांत रशिया आणि चीनने अंतराळ क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रचंड वेगाने संशोधन आणि चाचण्या सुरू केल्या आहेत. रशिया आणि चीन असे तंत्रज्ञान विकसित करत आहेत, ज्याद्वारे अमेरिकेच्या दळणवळण, जीपीएस (GPS) आणि गुप्तचर उपग्रहांमध्ये अडथळा आणता येऊ शकतो, त्यांना पूर्णपणे निष्क्रिय केले जाऊ शकते किंवा क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने नष्ट केले जाऊ शकते, अशी गंभीर चिंता अमेरिकन लष्कराला दीर्घकाळापासून सतावत होती.
आजच्या आधुनिक युगात सैन्याची हालचाल, क्षेपणास्त्रांचे मार्गदर्शन आणि डिजिटल नेटवर्क हे पूर्णपणे उपग्रहांवर अवलंबून असतात. त्यामुळे शत्रूने उपग्रह यंत्रणा ठप्प केल्यास संपूर्ण देश अपंग होऊ शकतो. याच धोक्याचा अंदाज घेऊन अमेरिकेने अंतराळातील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी थेट शस्त्रास्त्रांची तैनाती करण्याचा आक्रमक मार्ग निवडला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
अमेरिकेच्या या ऐतिहासिक आणि आक्रमक खुलाशामुळे आता जागतिक स्तरावर चिंतेचे ढग जमा झाले आहेत. अमेरिकेने अधिकृतपणे शस्त्रास्त्रांची तैनाती स्वीकारल्यामुळे आता चीन आणि रशियासारख्या प्रतिस्पर्धी महासत्ताही शांत बसणार नाहीत, हे उघड आहे. यामुळे येत्या काळात अंतराळात शस्त्रास्त्रांची एक नवी आणि अत्यंत धोकादायक शर्यत (Space Arms Race) सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे.
१९६७ च्या ‘आऊटर स्पेस ट्रीटी’नुसार अंतराळाचा वापर केवळ शांततापूर्ण कारणांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, महासत्तांच्या या नव्या पावलांमुळे अंतराळातील शांतता धोक्यात आली असून, भविष्यातील लष्करी संघर्ष केवळ जमिनीपुरता मर्यादित न राहता थेट पृथ्वीच्या कक्षेत खेळला जाईल, असे चित्र स्पष्ट होत आहे.