अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आज होणार मतदान
वॉशिंग्टन : अमेरिकेत बहुचर्चित, बहुप्रतिक्षित राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. यामध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. देशातील कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यानंतर काही दिवसांत या निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
हेदेखील वाचा : काही तासांत अमेरिकेत घेतला जाणार सर्वात मोठा निर्णय; भारतासह उर्वरित जगावर काय परिणाम होणार?
बॅलेट पेपरच्या माध्यमातून अनेक नागरिक मतदान करणार आहेत. त्यामुळे निकाल जाहीर होण्यासाठी काही दिवस लागू शकतात. 20 जानेवारीला देशाला नवा राष्ट्राध्यक्ष मिळेल, असे सांगितले जात आहे. निवडणूक प्रचार संपण्यापूर्वी दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी झोकून दिले. त्यामुळे निवडणुकीत चुरस आणखी वाढली आहे. ‘आम्ही जिंकणारच. आमच्या विजयाने अमेरिकेच्या राजकारणात नवे पर्व सुरू होईल’, असा विश्वास कमला हॅरिस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आज होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीबाबत जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. एलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदान होत आहे. यामुळे सध्या अमेरिकेत राजकीय वातावरण तापले आहे.
मिशेल ओबामा यांच्याकडून रॅली
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या निवडणुकीसाठी लढत सुरू आहे. त्यातच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मिशिगनमध्ये कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. मिशेल यांनी या रॅलीत कमला हॅरिस यांना पाठिंबा देत अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षाची निवड करण्यासाठी आवाहन केले होते.
एक माजी राष्ट्राध्यक्ष तर दुसऱ्या उपराष्ट्राध्यक्ष
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. जर कमला हॅरिस या निवडणुकीत विजयी झाल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनतील आणि डोनाल्ड ट्रम्प या निवडणुकीत विजयी झाल्यास ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होतील.
हेदेखील वाचा : अमेरिकेला मिळणार पहिली महिला राष्ट्रपती की पुन्हा ट्रम्प; मतदानाआधी सर्व्हे आला समोर