अमेरिकेत यंदा अध्यक्षीय निवडणुका होत असून येत्या २४ तासात मतदानाला सुरुवात होणार आहे
अमेरिकेत यंदा अध्यक्षीय निवडणुका होत असून येत्या २४ तासात मतदानाला सुरुवात होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ७ कोटींहून अधिक मतदारांनी आधीच प्रारंभिक मतदान प्रक्रियेद्वारे मतदान केलं आहे. यावेळी उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कडवी लढत होणार आहे. त्याआधी निवडणुकीचे सर्व्हे समोर आले आहेत. सट्टा बाजारात डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा दावा करण्यात येत आहे तर राष्ट्रीय सर्वेक्षणात दोघांमध्ये कडवी लढत होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रीय सर्वेक्षणांचा आढावा : Ipsos/ABC News च्या सर्वेक्षणात कमला हॅरिस यांनी आघाडी घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हा सर्व्हे २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आला होता, ज्यामध्ये २२६७ मतदारांनी भाग घेतला. Ipsos/ABC News च्या सर्वेक्षणात, हॅरिस यांना ४९ टक्के मतदारांचं समर्थन मिळताना दिसत आहे, तर ट्रम्प यांना ४६ टक्के मतदारांचं समर्थन आहे.
Emerson College च्या सर्वेक्षणात सुमारे १००० मतदारांनी भाग घेतला होता. २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान केलेल्या या सर्वेक्षणात डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारांमध्ये कडवी स्पर्धा दिसत आहे.
NBC News द्वारे प्रायोजित Hart Research Associates/Public Opinion Strategies च्या सर्वेक्षणात देखील दोन्ही उमेदवारांना समान मतदान मिळताना दिसत आहे. या सर्वेक्षणातही १००० मतदारांनी भाग घेतला. कमला हॅरिस आणि ट्रम्प यांना ४९-४९ टक्के समर्थन मिळत आहे.
कडवी लढत पहायला मिळत असली तरी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्पचं पारड जडं दिसत आहे. ABC News/538 च्या ताज्या आकडेवारीनुसार, ट्रम्प यांनी निवडणुकीपर्यंत ७ पैकी ५ स्विंग स्टेट्समध्ये चांगली आघाडी घेतली आहे. ही बढत निवडणुकीच्या निकालांवर मोठा परिणाम करू शकते.
उपाध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांमा पेनसिल्वेनियामध्ये मोठा धक्का बसला आहे. १९ इलेक्टोरल कॉलेज असलेल्या या राज्यात एक पॉइंटने त्या ट्रम्प यांच्यापेक्षा मागे आहेत. अॅरिझोनामध्ये ट्रम्प यांनी ३ पॉइंटची आघाडी मिळवली आहे, तर जॉर्जियामध्ये २ पॉइंटची तर नेवाडा आणि नॉर्थ कॅरोलिनामध्येही एक-एक पॉइंटची आघाडी घेतली आहे. कमला हॅरिस फक्त मिशिगन आणि विस्कॉन्सिनमध्ये एक पॉइंटने पुढे आहेत. ट्रम्प यांनी जर या ५ राज्यांमध्ये विजय मिळवला तर अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार सत्तेत येऊ शकतं.
अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत बहुतेक ताज्या सर्वेक्षणांमध्ये कडवी लढत पहायला मिळत आहे. सट्टा बाजारात मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावरून उत्साह आहे. सट्टा बाजारानुसार ट्रम्पच्या विजयाची शक्यता ५४.३ टक्के आहे, तर हैरिसच्या विजयाची शक्यता केवळ ४४.४ टक्के असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सर्वेक्षणातून अंदाज वर्तवण्यात आला तरी निवडणुकीत विजय कोणाचा होईल हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असून संपूर्ण जगाला याची उत्सुकता लागली आहेु.