ओलीस ठेवण्याचा कट, राजवाडा पाडण्याची योजना आणि रक्तपात; दलाई लामांना का सोडावं लागलं होतं तिबेट?
31 मार्च 1959… हा दिवस केवळ तिबेटच्या इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडासाठी एक क्रांतिकारक दिवस ठरला होता. याच दिवशी, तिबेटचे बौद्ध धर्माचे सर्वोच्च गुरु आणि आध्यात्मिक नेता, 14वे दलाई लामा, स्वतःच्या देशातून पलायन करून भारतात आश्रयाला आले होते. त्या दिवशी त्यांनी निर्वासित जीवनाची सुरुवात केली. मात्र त्यावेळी जे घडलं ते रोमांचक आणि बुद्ध धर्मासाठी वेदनादायक होतं.
गाझा युद्धबंदीच्या दिशेने पावले? नेतान्याहू-ट्रम्प भेटीत होऊ शकते मोठी घोषणा, पण अटींत अजूनही मतभेद
तिबेटची राजधानी ल्हासा आणि नोरबुलिंग्का राजवाडा, दलाई लामांचं अधिकृत निवासस्थान.. 1959 च्या मार्च महिन्यात अत्यंत तणावपूर्ण वातावरणात होतं. चीनने 1950 च्या दशकातच तिबेटवर हळूहळू वर्चस्व मिळवायला सुरुवात केली होती. आधी शांततेच्या नावाखाली सैन्य उतरवण्यात आलं, मग तेथील धार्मिक व राजकीय नेतृत्वावर दबाव वाढवण्यात आला. आणि 1959 च्या सुरुवातीला प्रचंड दडपशाहीचं सुरू झाली.
“मी एक धार्मिक परीक्षा देत असताना, माझ्याकडे चीनकडून एक निमंत्रण आलं. त्यांनी मला त्यांच्या सैनिकी तळावर एका कार्यक्रमासाठी येण्यास सांगितलं. पण त्यामध्ये एक अट होती – मी एकटाच यावं, कोणताही अंगरक्षक नको.” ही अट ऐकून तिबेट नेत्यांमध्ये आणि जनतेमध्ये खळबळ उडाली. आधीच पूर्वीच्या प्रांतांमध्ये लामांची हत्या सुरू होती आणि आता दलाई लामांनाच बंदी बनवण्याची शक्यता वाटत होती.
10 मार्चला ल्हासामध्ये तब्बल 30,000 तिबेटी नागरिक नोरबुलिंग्का महालासमोर जमा झाले. “दलाई लामांना महालाबाहेर जाऊ द्यायचं नाही असा त्यांनी निश्चय केला होता. याच दिवशी चीनच्या अधिकाऱ्यांनी “जर आंदोलन संपलं नाही, तर आम्ही सैनिकी कारवाई करू.” करण्याची धमकी दिली.
दलाई लामा द्वीदा मनस्थितीत अडकले होते. एकीकडे त्यांचे रक्षण करणारे लोक, दुसरीकडे त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करणारी चीनी सैन्य. त्यांनी शांततेसाठी वाटाघाटींचा प्रयत्न केला, पण 17 मार्चला नोरबुलिंग्का परिसरात दोन मोर्टार गोळे टाकण्यात आले. ही आक्रमणाची सुरुवात होती. आता वेळ फारच कमी होता.
त्याच रात्री, दलाई लामांनी स्वतः सैनिकाचा पोशाख परिधान केला. त्यांच्या सोबत मंत्री, अंगरक्षक, काही धार्मिक अधिकारी आणि कुटुंबातील सदस्य होते. अंधाऱ्या रात्रीत त्यांनी गुप्तपणे महालातून निघून नदी पार केली आणि हिमालयात लपून भारताच्या दिशेने वाटचाल सुरू केली. जवळ सामान नव्हतं, फक्त थोडे कपडे आणि तिबेट राजसत्तेच्या मोहरा, एक सांस्कृतिक अस्तित्वाचं प्रतीक. माझ्या लोकांना मी त्यांच्या भविष्याचं प्रतीक वाटतो. मी राहिलो असतो, तर माझ्यासोबत अनेक तिबेटींचा मृत्यू झाला असता. म्हणून मी रक्तपात टाळण्यासाठी तिबेट सोडलं , असं दलाई लामा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.
चीनने नंतर प्रचार केला की, दलाई लामांना बंडखोर तिबेटींनी बंधक बनवून भारतात पळवून नेलं. पण खुद्द दलाई लामा या आरोपाचा स्पष्ट इन्कार करतात. “हा माझा निर्णय होता. मी कोणत्याही दबावाखाली नव्हतो, पण माझ्या लोकांच्या रक्षणासाठी ही एकमेव पर्याय होता,” असं ते ठामपणे सांगतात.
1959 मध्ये जे काही घडलं, ते एका धर्मगुरूने आपल्या लोकांसाठी घेतलेलं जिवावर बेतणाऱ्या निर्णयाचं अत्यंत हृदयद्रावक आणि प्रेरणादायक उदाहरण आहे. आजही, भारतात निर्वासित म्हणून राहत असलेले दलाई लामा जगभर शांततेचे दूत म्हणून ओळखले जातात. पण त्यांचा हा संघर्ष, त्याग आणि तिबेटच्या अस्मितेचं रक्षण करण्याची त्यांची आंतरिक लढाई 20व्या शतकातील एक महत्त्वाची घटना बनली आहे.