Why did Trump change the name of the Department of Defense to the Department of War
Trump Department of War executive order : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे (Department of Defense) नाव बदलून त्याला “युद्ध विभाग” (Department of War) असे संबोधण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांच्या मते, हे नाव केवळ शक्ती आणि आक्रमकतेचा संदेश देत नाही, तर “विजयाची मानसिकता” जगासमोर ठेवते.
व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले “सध्याच्या जागतिक परिस्थितीचा विचार करता, युद्ध विभाग हेच अधिक योग्य नाव आहे. मला वाटते की हे नाव जगाला विजयाचा स्पष्ट संदेश देईल. अमेरिका केवळ बचावासाठी नाही तर विजयासाठी लढते.” त्यांच्या आदेशानुसार काँग्रेसची अधिकृत मंजुरी नसली तरी ‘युद्ध विभाग’ हे नाव पर्यायी स्वरूपात वापरले जाऊ शकते. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या इतिहासात युद्ध विभाग हे नाव नवीन नाही; उलट ते १५० वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : National Reading Day 2025 : ‘या’ खास दिनानिमित्त जाणून घ्या धावपळीच्या आयुष्यातही वाचनाची सवय कशी विकसित करावी?
१७८९ मध्ये अमेरिकेला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी युद्ध विभाग स्थापन केला. सुरुवातीला हा विभाग सैन्य, नौदल आणि मरीन कॉर्प्स यांचे नियंत्रण करत होता. पुढे नौदल व मरीन वेगळे करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धापर्यंत अमेरिकेत युद्ध विभाग अस्तित्वात होता. मात्र, त्या काळात विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे अमेरिकेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. पर्ल हार्बरवरील हल्ला रोखण्यात अपयश आल्याचे कारणही या विस्कळीत रचनेत असल्याचे मानले जाते.
१९४७ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (National Security Act) लागू केला. याअंतर्गत लष्कर, नौदल आणि नव्याने स्थापन झालेले हवाई दल यांना एकाच छत्राखाली आणण्यात आले. या नव्या संस्थेला सुरुवातीला National Military Establishment असे नाव दिले गेले. परंतु शीतयुद्धाची सावली गडद होत असताना “War” (युद्ध) या शब्दाऐवजी “Defense” (संरक्षण) हा शब्द जाणूनबुजून निवडला गेला. कारण, अमेरिकेचा उद्देश फक्त युद्ध करणे नव्हे तर भविष्यातील युद्धे टाळणे हा होता. त्यातूनच Department of Defense म्हणजेच संरक्षण विभाग जन्माला आला.
ट्रम्प यांचे म्हणणे आहे की गेल्या काही दशकांत अमेरिकेला ज्या संघर्षांत अपयश आले, त्यामागे एक मोठे कारण म्हणजे “संरक्षण” ही बचावात्मक मानसिकता. त्यांच्या शब्दांत “आम्ही प्रत्येक युद्ध जिंकू शकलो असतो, परंतु आम्ही ‘राजकीयदृष्ट्या योग्य’ राहणे निवडले. संरक्षण विभागाचे नाव खूपच बचावात्मक आहे. मला बचाव करायचाय, पण मला आक्रमकपणाही दाखवायचा आहे.” त्यामुळेच त्यांनी हे नाव बदलून पुन्हा “युद्ध विभाग” म्हणून जगासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांच्या ‘Make America Great Again’ या राजकीय घोषणेशी जोडलेले आहे.
व्हर्जिनिया विद्यापीठाचे प्रख्यात इतिहासकार मेल्विन लेफ्लर म्हणतात की, युद्धाऐवजी संरक्षण हा शब्द निवडला जाणे हे शीतयुद्धाच्या काळात अतिशय महत्त्वाचे ठरले होते. कारण दोन्ही महासत्ता अमेरिका आणि सोव्हिएत अण्वस्त्रांनी सज्ज होत्या. त्यामुळे युद्धाऐवजी “संरक्षण” या संकल्पनेवर भर देऊन भविष्यातील संघर्ष टाळण्याचा अमेरिकेचा प्रयत्न होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एकाच पत्नीचे 15 पती, पंजाबहून इंग्लंडला पोहोचले सर्व जण मग कथेत आला एक अनोखा ट्विस्ट; पाहून पोलिसही थक्क
आज मात्र ट्रम्प यांच्या या घोषणेने पुन्हा एकदा चर्चा रंगवली आहे. काहींना हे पाऊल जगभरातील अमेरिकन शक्तीचे प्रदर्शन वाटते, तर काहींना ते फक्त राजकीय नाट्य. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे ट्रम्प यांची शैली सदैव वेगळी असते आणि त्यांचे निर्णय जगभर चर्चेत राहतात. संरक्षण विभागाचे नाव बदलून ‘युद्ध विभाग’ असे करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय हा केवळ प्रशासनिक बदल नाही. तो अमेरिकन राजकारणातील “विजयाच्या मानसिकतेचा पुनरागमन” असा संदेश आहे. इतिहास, राजकारण आणि जागतिक रणनीती या तिन्ही स्तरांवर ही घोषणा चर्चेचा विषय ठरली आहे.