Will US return to Afghanistan Pakistan plot a plan to grab Donald Trump's attention
इस्लामाबाद: अमेरिकन सैन्य पुन्हा पाकिस्तानात परत येणार अशा विश्वास पाकिस्तानने दर्शवला असून सध्या लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी यासाठी नवा मास्टर प्लॅन रचला असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानी सैन्य लवकरच अफगाणमधील इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवादी गटांविरोधात कारवाई सुरु करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदतही रोखली होती.
पाकिस्तानने दहशतवादाच्या नावाखाली अमेरिकेकडून अब्जो डॉलर्स घेतले होते मात्र, अद्याप यावर कोणताही तोडगा न काढल्याने ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला होता. यामुळे आता पुन्हा डोनाल्ड ट्रम्प ला खुश करण्यासाठी पाकिस्तानने नवा डाव खेळला आहे.
जनरल असीम मुनीर यांची नवी रणनिती
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी एक व्यापक योजना आखली असून यामुळे अमेरिकन लष्कराची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. याशिवाय, देशांतर्गत राजकीय संकट हाताळण्यासाठी हा डाव रचला जात असल्याचे मानले जात आहे. इमरान खान यांच्या पाकिस्तान चहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाचा दबाव कमी करण्यासाठी आणि पाकिस्तानी सैन्य व सरकारमध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी हा प्लॅन बनवण्यात आला आहे.
इमरान खानचा त्याग करणार पाकिस्तानी लष्कर?
2022 मध्ये इमरान खान यांना सत्तेवरुन हटवण्यात आले आणि त्यानंतर पाकिस्तान लष्कर आणि PTI यांच्यात राजकीय तणाव वाढत गेला. गेल्या वर्षीच्या 2024च्या निवडणुकांमध्ये निर्माण झालेल्या अडचणींमुळे सध्या PTI पक्ष दडपशाहीचा सामना करत आहे. PTI च्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले असून, काहींना धमक्या मिळत आहेत.
आता पाकिस्तान लष्कराला अफगाणिस्तानमधील संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत पाठिंबा हवा आहे, यामुळे PTI सोबत वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, यासाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. PTI ला लष्कराच्या वर्चस्वासमोर नतमस्तक व्हावे लागेल आणि इमरान खान यांना बाजूला करावे लागेल अशी अट लष्कराने ठेवली आहे.
PTI आणि लष्करातील चर्चा
गेल्या महिन्यात पाक-अफगाण सीमेलगत असलेल्या पेशावरमध्ये लष्करप्रमुख मुनीर आणि PTIच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीदरम्यान व्यापारी, स्थानिक नेते आणि सुरक्षा क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती उपस्थित होत्या. या बैठकीनंतर PTI आणि लष्कर यांच्यातील संघर्ष मिटण्याच्या मार्गावर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. PTI कार्याध्यक्ष गौहर अली खान यांनी सांगितले की, इमरान खान यांनी तुरुंगातूनही या चर्चांना पाठिंबा दिला असल्याचे म्हटले होते.
पाकिस्तानी लष्कराने, अफगाणिस्तानात मोठी लष्करी कारवाई केली, तर अमेरिका पुन्हा या भागात रस घेईल. विशेषतः पाकिस्तानला पुन्हा मोठी आर्थिक आणि लष्करी मदत मिळू शकते. यामुळे, पाकिस्तान आता अमेरिकेला पुन्हा अफगाणिस्तानात ओढण्याच्या प्रयत्नात आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या राजकीय आणि सुरक्षेच्या परिस्थितीत मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कॅरिबियन समुद्रात 7.6 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी