'सर्व ओलिसांची सुटका करावी' ; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचा हमासला इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचे समर्थन करत हमासकडे सर्व ओलिसांच्या तात्त्काळ सुटकेची मागणी केली आहे. रुबियो यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “490 दिवसांच्या एली, ओर आणि ओहद अखेर इस्रायलमध्ये आपल्या घरी परतले आहेत. राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट सांगितले होते की हमासने सर्व बंधकांची सुटका करावी!” या संबंधित त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली आहे.
इस्रायलने युद्धविरामाच्या कराराचा भाग म्हणून तीन बंधकांची सुटका झाल्याची पुष्टी केल्यानंतर रुबियो यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शनिवारी, इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने जाहीर केले की ओहद बेन अमी, एली सराबी आणि ओर लेवी यांना रेड क्रॉसच्या ताब्यात देण्यात आले आणि नंतर त्यांना इस्रायली प्रदेशात आणण्यात आले. त्यानंतर त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कॅरिबियन समुद्रात 7.6 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी
After 490 harrowing days in captivity, Eli, Or, and Ohad are finally home in Israel. @POTUS was clear – Hamas MUST release ALL hostages NOW!
— Secretary Marco Rubio (@SecRubio) February 8, 2025
इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, ओलिसांची सुटका करण्यापूर्वी हमासने एक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बंधकांना एक प्रचारात्मक शोमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले गेले. या कार्यक्रमात एका नकाबपोश हमास सदस्याने भाषण दिले आणि तीन बंधकांना प्रमाणपत्र धरून मंचावर उभे केले. या वेळी अरबी, हिब्रू आणि इंग्रजी भाषांमध्ये “आम्ही महापुर आहोत, युद्धाचा पुढचा दिवस” असे बॅनर झळकत होते.
183 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका
तसेच, या युद्धविरामाच्या करारांतर्गत इस्रायलने 183 पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करण्याचे ठरवले आहे. यामध्ये नेगेवमधील केजियोट तुरुंग आणि वेस्ट बँकच्या ओफर तुरुंगातील कैदींचा समावेश आहे. यातील 18 कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते आणि सात जणांना निर्वासित केले जाणार आहे. 111 कैदी गाझामधील युद्धादरम्यान अटक झाले होते, तर उर्वरित 72 जण वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधील आहेत.
युद्धबंदी करार आणि तीन टप्प्यांची योजना
इस्त्रायल आणि हमासमधील करार तीन टप्प्यात पुर्ण होणार असून यामध्ये आतापर्यंत 42 ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. पहिला टप्प्या 19 जानेवारी ते 7 मार्च पर्यत आहे. या काळात या काळात पूर्ण युद्धबंदी असणार आहे. तर दुसरा टप्प्यात 3 फेब्रुवारीनंतर पहिल्या टप्प्यातील सर्व अटींचे पालन केल्यास उर्वरित जिवंत बंधकांची सुटका करण्यात येणार आहे. तर शेवटच्या टप्प्यात गाझाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया होणार आहे.