फोटो सौजन्य सोशल मीडिया
लातेई मोझेस यांचे अनेक वर्षांपासून केनियातील दुर्मिळ काळ्या बिबट्याचे छायाचित्र टिपण्याचे स्वप्न आहे . स्थानिक भाषेत या बिबट्याला गिझा असे संबोधले जाते . उत्तर केनियातील लायकीपिया या दुर्गम भागात हा बिबट्या आढळत असल्याचे सांगितले जाते .
मात्र त्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ असल्याने त्याचा शोध घेणे सोपे नाही . या मोहिमेत मोझेस यांना खडतर भूप्रदेश ,शारीरिक थकवा आणि वारंवार येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे . अनेक प्रयत्नानंतरही बिबट्याचे छायाचित्र टिपण्याचे त्यांचे उद्दिष्ट अजून आव्हानात्मक आहे .
मोझेस यांचा हा प्रवास केवळ एका दुर्मिळ वन्यप्राण्याचा शोध घेण्यापुरता मर्यादित नाही . जगभरात मासाई समुदायातील छायाचित्रकार असल्याने मोझेस आपल्या लोकांचे जीवन,परंपरा आणि संस्कृती स्वतःच्या दृष्टीकोनातून जगासमोर आणू इच्छितात . कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या समुदायाची खरी ओळख मांडण्याचा त्यांच्या प्रयत्न आहे . त्यामुळे त्यांच्या मोहिमेला सांस्कृतिक महत्वही प्राप्त झाले आहे .
लातेई यांच्या या अनोख्या मोहिमेवर Beyond the Horizon: Searching for Giza हा माहितीपट तयार करण्यात आला आहे . मोहतादी अली अहमद , मोहम्मद अली अहमद आणि क्रिस्तेल सादे यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे . यात काळ्या बिबट्याचा शोध , जंगलातील आव्हाने आणि मासाई समुदायाशी असलेले मोझेस यांचे नाते दाखवण्यात आले आहे .
एका दुर्मिळ वन्यप्राण्याचे छायाचित्र मिळवण्याच्या ध्यासासोबतच स्वतःच्या समुदायाची कहाणी स्वतःच्या नजरेतून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न या माहितीपटातून समोर येतो . आता या मोहिमेत मोझेस यांना गिझा छायाचित्र टिपण्यात यश मिळते का ,याची उत्सुकता आहे . मासाई समुदायाच्या परंपरा आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नाते या मोहिमेतून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे . दुर्मिळ वन्यजीवाला कॅमेऱ्यात कैद करण्याच्या या प्रयत्नांकडे वन्यजीवप्रेमी आणि छायाचित्रकारांचे लक्ष लागले आहे .






