
फोटो सौजन्य: iStock
राहाता, शिर्डी आणि संगमनेर वगळता जिल्ह्यातील इतर बहुतांश ठिकाणी महायुतीत मोठ्या प्रमाणात फूट पडल्याचे दिसत आहे. या फुटीमुळे जामखेड, श्रीरामपूर, पाथर्डी, श्रीगोंदे आणि शेवगाव येथील निवडणुका अधिकच चुरशीच्या झाल्या आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रत्येक नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागल्याने पुढील दिवसांत आरोप-प्रत्यारोपांची मालिका अधिक तीव्र होणार, अशी चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी ही फूट पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक स्तरावरील नाराजीतून निर्माण झाल्याचे दिसते.
नितीश कुमार फक्त चेहरा मात्र ‘स्टीअरिंग व्हील’ भाजपकडेच; अमित शहांनी खेळली ‘ही’ स्मार्ट खेळी
अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील निवडणूक कार्यालयांना अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते. काही गट उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत होते, तर काही गट अर्ज मागे जाऊ नये यासाठी जोर लावत होते. श्रीरामपुरात महायुतीच्या उमेदवारावर अर्ज मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दबाव आणण्यात आला होता; मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वेळेत हस्तक्षेप करून त्यांना समजूत घातली. शिर्डीत भाजपाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्या प्रभागातील अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला.
जामखेडमध्ये महायुतीत आधीच फूट असताना राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या प्रिती राळेभात यांनी नगराध्यक्षपदासाठी बंड पुकारले आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. भाजपा, अजित पवार गट आणि शिंदे गटातील शिवसेना, या तिन्ही पक्षांचे उमेदवार स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवत असल्याने स्पर्धा अधिक तीव्र बनली आहे.
पाथर्डी आणि शेवगाव येथेही महायुतीत फूट पडली असून मविआ मात्र एकसंध व मजबूत दिसत आहे. त्यामुळे येथील निवडणुकांत आमदार मोनिका राजळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Local Body Election: ऐन थंडीत गुहागरचे राजकारण तापले; नगराध्यक्षपदांचे अर्ज झाले बाद
श्रीगोंद्यात महायुतीत फूट असल्याचे चित्र समोर येत असले, तरी प्रत्यक्षात ही फूट आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या विरोधकांमध्ये असल्याचे दिसते. अजित पवार गट, भाजपा आणि शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार असले तरी त्यांचा रोख नेहमीच पाचपुते यांच्या विरोधात असतो. त्यामुळे ही फूट महायुतीतील नसून “पाचपुते विरोधकांचा अंतर्गत संघर्ष” असल्याचे अधिक योग्य ठरते. त्यात मविआनेही स्वतंत्र उमेदवार दिल्याने समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
श्रीरामपुरातही महायुती आणि मविआ, या दोन्ही आघाड्यांत फूट पडली आहे. भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांच्या विरोधात माजी खासदार सुजय विखे यांनी श्रीनिवास बिहाणी यांच्या हातात कमळ दिले. काँग्रेसने परंपरागत ससाणे कुटुंबातील करण ससाणे यांना उमेदवारी दिली. उबाठा गटाने स्वबळाचा नारा देत अशोक थोरे यांना रिंगणात उतरवले. अशा रीतीने श्रीरामपूरात दोन्ही आघाड्यांतील मतभेद अधिकच प्रकर्षाने जाणवत आहेत.