
भारतातील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलत केंद्र सरकार ‘भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम’चा दुसरा टप्पा म्हणजेच Bharat NCAP 2.0 लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवी दिल्ली येथे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या ६६ व्या वार्षिक परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली.
ऑक्टोबर २०२७ पासून लागू होणार नवे नियम
Bharat NCAP 2.0 चा हा नवा टप्पा ऑक्टोबर २०२७ पासून अधिकृतपणे लागू केला जाईल. या नवीन टप्प्याअंतर्गत वाहनांच्या संपूर्ण ‘सेफ्टी चेन’चे (Safety Chain) पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे. यासाठीच्या सर्व चाचण्या आणि नियमांची आखणी पूर्ण झाली असून, लवकरच वाहन उत्पादक कंपन्या आणि संबंधित यंत्रणांना या नव्या अपडेट्सची माहिती दिली जाईल.
तरुणांच्या सुरक्षेसाठी कडक नियमांची गरज
भारतातील रस्ते अपघातांची आकडेवारी चिंताजनक असल्याचे सांगत गडकरी यांनी वाहनांची मजबूती आणि प्रवाशांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. देशात दरवर्षी सुमारे ५ लाख रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये सुमारे १.८० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. गंभीर बाब म्हणजे, या अपघातांमध्ये प्राण गमावणाऱ्यांमध्ये तब्बल ६०% प्रमाण हे १८ ते ३६ वर्षे वयोगटातील तरुणांचे आहे. हे अपघात रोखण्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि भारतीय स्टार्टअप्सने विकसित केलेल्या आधुनिक सुरक्षा प्रणालींचा वापर Bharat NCAP 2.0 मध्ये केला जाणार आहे.
ग्लोबल NCAP च्या तुलनेत ७५ टक्के स्वस्त
भारताचा हा सेफ्टी टेस्ट प्रोग्राम आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुकास पात्र ठरत आहे. नुकताच मोरोक्को येथे या प्रोग्रामला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.ग्लोबल क्रॅश टेस्टच्या तुलनेत भारतीय Bharat NCAP ची चाचणी तब्बल ७५ टक्के स्वस्त आहे. जिथे ग्लोबल NCAP अंतर्गत एका वाहनाची चाचणी करण्यासाठी साधारण २.५ कोटी रुपये खर्च येतो, तिथे Bharat NCAP मध्ये ही चाचणी केवळ ६० लाख रुपयांत पार पडते.
आत्तापर्यंत या प्रोग्रामअंतर्गत ११ वेगवेगळ्या कंपन्यांच्या ३० हून अधिक वाहनांची यशस्वी क्रॅश टेस्ट करण्यात आली आहे. कमी खर्च आणि कमी वेळेत अचूक निकाल मिळत असल्यामुळे अनेक परदेशी वाहन उत्पादक कंपन्यांनीही आपल्या गाड्यांची क्रॅश टेस्ट भारतात करून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.