
आपण बऱ्याच विज्ञानकथांमध्ये आणि (Science Fiction Movies) चित्रपटांमध्ये फ्लाइंग कार म्हणजेच हवेत उडणाऱ्या कार नक्कीच पहिल्या असतील. पण खरोखरच फ्लाइंग कार हे वास्तवात शक्य असणारी गोष्ट आहे कि फक्त पाश्चिमात्य चित्रपटांमधील एक बळ धरलेली कल्पना. पाहायला गेलं तर काही ४००-500 वर्षांपूर्वी, रस्त्यांवरून धावणाऱ्या कारगाड्या किंवा आकाशात उंच उडणारी विमाने हेही निव्वळ कल्पनांचीच गोष्ट होती. पण मानवाच्या बुद्धीकौशल्याने आणि तंत्रज्ञानाच्या जोडीने माणूस वाऱ्याच्या वेगाने प्रवास करायलाही शिकला, आणि पक्ष्यांच्या बरोबरीने हवेत उड्डाण करायलाही शिकला. मग प्रश्न येतो हा कि एवढे मागचे वर्ष ज्या फ्लाइंग कार बद्दल विज्ञानकथांमध्ये, सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये दाखवलं गेलंय ती फक्त कल्पनाच कि मानवाच्या वाहतूक क्षेत्राच्या भविष्यातील येणारी तंत्रज्ञानाची नवी किमया?
फ्लाइंग कार म्हणजे नेमके काय?
सामान्य लोकांच्या कल्पनेतील फ्लाइंग कार म्हणजे रस्त्यावर चालणारी आणि गरज पडल्यास आकाशात उडणारी कार. मात्र आज विकसित होत असलेली बहुतांश “फ्लाइंग कार” ही प्रत्यक्षात eVTOL (Electric Vertical Take-Off and Landing) वाहने आहेत. ही वाहने हेलिकॉप्टरप्रमाणे उभी उड्डाण करू शकतात आणि विजेवर चालतात.
फ्लाइंग कारची संकल्पना कधी सुरू झाली?
• 1917 मध्ये अमेरिकन संशोधकांनी उडणाऱ्या कारच्या संकल्पना मांडल्या.
• 1940-50 च्या दशकात काही प्रोटोटाइप तयार झाले.
• मात्र त्या काळातील इंजिन, इंधन कार्यक्षमता आणि सुरक्षा तंत्रज्ञान अपुरे होते.
• आधुनिक बॅटरी, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इलेक्ट्रिक मोटर्समुळे गेल्या दशकात या क्षेत्रात वेगाने प्रगती झाली आहे.
आज कोणत्या कंपन्या फ्लाइंग कार विकसित करत आहेत?
प्रमुख कंपन्यांमध्ये:
• Joby Aviation
• Archer Aviation
• Eve Air Mobility
• Vertical Aerospace
यापैकी अनेक कंपन्यांनी यशस्वी चाचणी उड्डाणे केली आहेत. Eve Air Mobility ने पूर्ण आकाराच्या eVTOL प्रोटोटाइपचे पहिले यशस्वी उड्डाण पूर्ण केले असून हजारो प्री-ऑर्डर नोंदविल्या गेल्या आहेत.
फ्लाइंग कारचे संभाव्य फायदे
1. वाहतूक कोंडी कमी होऊ शकते- मोठ्या शहरांमध्ये रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी हवाई मार्गांचा वापर करता येईल. NASA च्या Advanced Air Mobility कार्यक्रमानुसार भविष्यात कमी उंचीवरील प्रवासी वाहतूक ही शहरी वाहतुकीचा महत्त्वाचा भाग बनू शकते.
2. आपत्कालीन सेवांसाठी उपयुक्त- रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव मोहिमांसाठी फ्लाइंग कार्सची मोठी मदत होऊ शकते.
3. पर्यावरणपूरक पर्याय- बहुतांश eVTOL वाहने इलेक्ट्रिक असल्याने कार्बन उत्सर्जन तुलनेने कमी असू शकते. आणि त्यामुळेच या वाहनांमुळे प्रदूषणावरही रोख बसू शकतो.
आता हवेत उडायचे दिवस आले! ‘या’ देशात Flying Car ची विक्री सुरु, जाणून …
सर्वात मोठी आव्हाने
सुरक्षा- NASA आणि विविध विमानन संस्थांच्या मते सुरक्षेचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे क्रॅश टेस्ट, फ्लाइट टेस्ट आणि प्रमाणपत्र प्रक्रिया अजून सुरू आहेत.
बॅटरी क्षमता- आजच्या बॅटरी तंत्रज्ञानामुळे उड्डाणाचा कालावधी आणि अंतर मर्यादित आहे.
हवाई वाहतूक व्यवस्थापन- शेकडो फ्लाइंग कार एकाच वेळी आकाशात असतील तर त्यांचे नियंत्रण करणे अत्यंत गुंतागुंतीचे ठरेल. यासाठी नवीन एअर ट्रॅफिक सिस्टम विकसित करावी लागेल, असे NASA आणि विविध विमानन संस्थांचे म्हणणे आहे.
फ्लाइंग कारसाठी विशेष उड्डाण आणि लँडिंग केंद्रांची आवश्यकता ही प्रमुख पायाभूत सुविधा असेल.
संशोधन काय सांगते?
2025 मध्ये प्रकाशित झालेल्या शहरी हवाई गतिशीलतेवरील (Urban Air Mobility) संशोधनानुसार तंत्रज्ञान व्यवहार्य आहे, परंतु मोठ्या प्रमाणावर वापरासाठी विमानन नियम, पायाभूत सुविधा, स्वयंचलित नियंत्रण प्रणाली आणि सुरक्षिततेची मानके विकसित करणे आवश्यक आहे.
NASA च्या अंदाजानुसार 2030 पर्यंत Advanced Air Mobility उद्योग व्यावसायिक स्वरूपात विकसित होऊ शकतो.
मार्केटमध्ये आली हवेत उडणारी कार; समोरील कारला मागे सारत अशी …
निष्कर्ष
फ्लाइंग कार ही केवळ विज्ञानकथा राहिलेली नाही. जगभरातील कंपन्या अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करून eVTOL वाहने विकसित करत आहेत आणि अनेक यशस्वी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तरीही सुरक्षा, बॅटरी क्षमता, आवाज नियंत्रण, हवाई वाहतूक व्यवस्थापन आणि सरकारी प्रमाणपत्रे ही मोठी आव्हाने अजून शिल्लक आहेत. तज्ज्ञांच्या मते 2030 च्या दशकात “एअर टॅक्सी” सेवा सामान्य होऊ शकते; मात्र प्रत्येकाच्या घरासमोर स्वतःची फ्लाइंग कार उभी असेल, तो काळ अजून खूप दूर आहे. सध्याच्या संशोधनाच्या आधारे फ्लाइंग कार हे भविष्यातील वास्तव आहे, परंतु ते टप्प्याटप्प्याने आणि मर्यादित स्वरूपातच पहिल्यांदा दिसेल.