
वाहने अधिक क्लिष्ट होत चालल्याने भारताच्या ऑटोमोटिव्ह स्किलिंग इकोसिस्टमने प्रमाणपत्रांपेक्षा प्रत्यक्ष कौशल्यांवर अधिक भर देणे जास्त गरजेचे आहे, असे मत ‘लुकस इंडियन सर्व्हिसेस’चे अध्यक्ष राघवन एन. यांनी व्यक्त केले आहे.
राघवन यांनी सांगितले की, सध्याची व्यवस्था प्रमाणपत्रांच्या बाबतीत मजबूत आहे, पण ती नेहमीच पुरेशा व्यावहारिक कौशल्यांमध्ये ट्रान्स्फर होत नाही, विशेषतः स्वतंत्र आफ्टरमार्केटमध्ये वाहनांची दुरुस्ती करणाऱ्या तंत्रज्ञांमध्ये ही कमतरता जाणवते. ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वार्षिक परिषदेत बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.
इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, कनेक्टेड तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर-चालित वाहनांमुळे वाहन निदान आणि दुरुस्ती अधिक जटील बनत चालल्याने ही कौशल्याची पोकळी अधिक गंभीर होत चालली आहे असे त्यांचे मत आहे. भारतातील स्वतंत्र वाहन दुरुस्ती क्षेत्रात टेक्नीशियनससाठी अद्याप कोणतेही एकसमान स्टँडर्ड नाही, असेही ते म्हणाले.
स्वतंत्र वर्कशॉप्सची भूमिका आणि आव्हाने
ऑफीशल डीलरशिप्स वाहन उत्पादकांनी ठरवून दिलेले प्रशिक्षण देतात, परंतु त्यांचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे स्वतंत्र वर्कशॉप्स महत्त्वाची भूमिका बजावतात, पण या क्षेत्रातील अनेक तंत्रज्ञांकडे तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाचा अभाव आहे. छोट्या शहरांपर्यंत अधिकृत सेवा पोहोचत नसल्याने स्वतंत्र आफ्टरमार्केट तंत्रज्ञांना सक्षम करणे ही तातडीची गरज बनली आहे.
वाहनांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअरचा वाढता वापर पाहता तंत्रज्ञांना पारंपारिक मेकॅनिकल दुरुस्तीसोबतच डायग्नोसिस कौशल्यात पारंगत व्हावे लागेल. वाहने १५ ते २० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ रस्त्यावर धावणार असल्याने, त्यांच्या जीवनचक्रात त्यांना सांभाळण्याचे काम हे स्वतंत्र तंत्रज्ञच करत असतात. त्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन सक्षम करणे गरजेचे आहे.