
रस्त्यावरून वळण घेताना किंवा लेन बदलताना इतर वाहनचालकांना सावध करण्यासाठी ‘इंडिकेटर’ हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. आज प्रत्येक लहान-मोठ्या वाहनाचा तो अनिवार्य भाग आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, या अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षा साधनाची संकल्पना एका वैज्ञानिक किंवा इंजिनिअरने नाही, तर चक्क हॉलिवूडच्या पहिल्या सायलेंट फिल्मस्टार अभिनेत्रीने विकसित केली होती, आहे नं इंटरेस्टिंग?
इंडीकेटरचा इतिहास आणि शोध
२० व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा गाड्या रस्त्यांवर धावू लागल्या, तेव्हा वळताना हात दाखवण्याची पद्धत होती. रात्रीच्या वेळी यामुळे मोठे अपघात व्हायचे. या समस्येवर उत्तर शोधले हॉलिवूड अभिनेत्री फ्लॉरेन्स लॉरेन्स यांनी.
१९१४ मध्ये त्यांनी ‘ऑटो सिग्नलिंग आर्म’ नावाचे मशीन बनवले. गाडीच्या पाठीमागील बंपरवर दोन छोटे झेंडे बसवले होते. ड्रायव्हरने सीटजवळ असलेले बटण दाबले की, डाव्या किंवा उजव्या बाजूचा झेंडा वर उचलला जायचा, ज्यामुळे मागच्या वाहनाला गाडी कुठे वळणार आहे हे समजायचे.
पेटंटची सर्वात मोठी चूक
फ्लॉरेन्स लॉरेन्स या कलेच्या जगात जितक्या हुशार होत्या, तितक्या त्या बिझनेस आणि कायद्याच्या बाबतीत अनभिज्ञ होत्या. त्यांनी आपल्या या क्रांतिकारी उपकरणाचे पेटंट घेतलेचं नाही. परिणामी, त्यांना या शोधाचे कोणतेही श्रेय किंवा आर्थिक फायदा मिळाला नाही. त्यानंतर, १९२५ मध्ये एडगर ए. वॉल्झ ज्युनिअर यांनी आधुनिक फ्लॅशिंग लाईटच्या इंडिकेटरचे अधिकृत पेटंट घेतले.
कार कंपन्यांची उदासीनता आणि मिळालेली प्रसिद्धी
सुरुवातीला एडगर यांनी हे इंडिकेटर मोठ्या कार कंपन्यांना विकण्याचा प्रयत्न केला, पण कंपन्यांनी यात रस दाखवला नाही. चौदा वर्षांनंतर त्यांचे पेटंट संपले. शेवटी १९३९ मध्ये ‘ब्युइक’ या प्रसिद्ध अमेरिकन कार कंपनीने पहिल्यांदा आपल्या गाड्यांमध्ये फॅक्टरी-फिटेड फ्लॅशिंग इंडिकेटर देण्यास सुरुवात केली. यानंतर हा शोध जगभरात तुफान प्रसिद्ध झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर जवळजवळ सर्वच कार कंपन्यांसाठी इंडिकेटर देणे बंधनकारक झाले.
फ्लॉरेन्स लॉरेन्स यांनी लावलेला हा साधा शोध आज करोडो लोकांचे प्राण वाचवत आहे आणि ऑटोमोबाईल क्षेत्राचा अविभाज्य घटक आहे. म्हणूनच, जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी गाडीचे इंडिकेटर चालू कराल, तेव्हा मूकपटाच्या ‘त्या’ लेजंडरी अभिनेत्रीची आठवण नक्की काढा!