
Mumbai Auto Taxi Shortage: मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोची कमतरता; (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
या परिस्थितीमागे राज्य सरकारच्या नव्या नियमाचा संबंध असल्याचे बोलले जात आहे. ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यवहारातील ज्ञान असणे आवश्यक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे चालकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, ऑटो-टॅक्सी संघटनांनी अधिकृत संप पुकारलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नव्या नियमांनुसार मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांना सुरुवातीला कारणे दाखवा नोटीस दिली जाऊ शकते. त्यानंतर नियमांचे पालन न झाल्यास परवाना काही काळासाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. वारंवार नियम मोडल्यास परवाना आणि परमिट रद्द होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
याच कारवाईच्या भीतीमुळे काही चालकांनी सोमवारी कामावर न जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा रिक्षा संघटनांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये अचानक वाहनांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसले.कांदिवलीतील एका प्रवाशाने सांगितले की, नेहमी काही मिनिटांत मिळणारी रिक्षा सोमवारी तब्बल २५ मिनिटे वाट पाहिल्यानंतर मिळाली. संबंधित चालकाने मराठी भाषेच्या नव्या नियमामुळे काही चालक रस्त्यावर आले नसल्याचे सांगितल्याचे त्याने नमूद केले.
दरम्यान, चालकांच्या संघटनांनीही सरकारच्या निर्णयाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एका महिन्यात मराठी शिकण्याची अपेक्षा केली जात असेल, तर त्यासाठी योग्य प्रशिक्षण कुठे दिले जाणार, असा सवाल संघटनांनी केला आहे. चालकांना रोजच्या व्यवहारात प्रवाशांशी बोलता यावे, एवढे व्यावहारिक भाषाज्ञान मिळणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.काही संघटनांनी ऑनलाइन मराठी वर्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. नोकरी सांभाळून प्रशिक्षण घेण्यासाठी ऑनलाइन माध्यम अधिक सोयीचे ठरेल, असा त्यांचा दावा आहे.
एकीकडे प्रवाशांना रिक्षांच्या कमतरतेचा फटका बसला, तर दुसरीकडे चालकांमध्ये नव्या नियमाबाबत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. त्यामुळे सरकार आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांमध्ये यावर लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे. अन्यथा रोजच्या प्रवासासाठी रिक्षांवर अवलंबून असलेल्या मुंबईकरांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.