
टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय हॅरिअर आणि सफारी एसयूव्हीचे नवीन स्टेल्थ एडिशन लॉन्च केले आहे. काळ्या रंगाच्या आकर्षक आणि दमदार लूकला पसंती देणाऱ्या ग्राहकांसाठी हे विशेष एडिशन सादर करण्यात आले आहे. टाटा हॅरिअर स्टेल्थ एडिशनची एक्स-शोरूम किंमत 23.43 लाख रुपये, तर टाटा सफारी स्टेल्थ एडिशनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 24.04 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
हॅरिअर स्टेल्थ एडिशन
हॅरिअर स्टेल्थ एडिशन हे कंपनीच्या Fearless Ultra व्हेरिएंटवर आधारित आहे, तर सफारी स्टेल्थ एडिशन Accomplished Ultra व्हेरिएंटवर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही एसयूव्हीमध्ये प्रीमियम फीचर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी केबिन आणि आधुनिक सुरक्षा सुविधा मिळतात. या स्पेशल एडिशनचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचा वेगळा डिझाइन आणि डार्क थीम.
टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच; ६६५ किमी रेंजसह नव्या रूपात पुनरागमन!
या दोन्ही एसयूव्हीमध्ये मॅट ब्लॅक एक्सटेरिअर पेंट, 19 इंचांचे ब्लॅक अलॉय व्हील्स आणि फ्रंट फेंडरवर ‘Stealth’ बॅज देण्यात आला आहे. यामुळे गाडीचा लूक अधिक स्पोर्टी आणि आक्रमक दिसतो. आतमध्ये कार्बन नॉयर थीम वापरण्यात आली असून संपूर्ण केबिन ब्लॅक फिनिशमध्ये सजवण्यात आले आहे. मात्र, इंटिरिअरचे डिझाइन नियमित हॅरिअर आणि सफारीप्रमाणेच ठेवण्यात आले असून, आतमध्ये स्टेल्थ एडिशनचे वेगळे बॅजिंग देण्यात आलेले नाही.
इंजिन
इंजिनच्या बाबतीत ग्राहकांना दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असून ते 168 एचपी पॉवर आणि 280 एनएम टॉर्क निर्माण करते. दुसरा 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन असून ते 168 एचपी पॉवर आणि 350 एनएम टॉर्क देते. दोन्ही इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. टाटा हॅरिअर स्टेल्थ एडिशन चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल मॅन्युअलची किंमत 23.43 लाख रुपये, पेट्रोल ऑटोमॅटिकची 24.85 लाख रुपये, डिझेल मॅन्युअलची 24.56 लाख रुपये आणि डिझेल ऑटोमॅटिकची 26.01 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
‘टाटा सिएरा ईव्ही’ भारतात लाँच! ६६५ किमी रेंजसह १८.७९ लाख रुपयांपासून बुकिंग सुरू
टाटा सफारी स्टेल्थ एडिशन
टाटा सफारी स्टेल्थ एडिशन सहा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 7-सीटर पेट्रोल मॅन्युअलची किंमत 24.04 लाख रुपये, 7-सीटर पेट्रोल ऑटोमॅटिकची 25.46 लाख रुपये, 6-सीटर पेट्रोल ऑटोमॅटिकची 25.56 लाख रुपये, 7-सीटर डिझेल मॅन्युअलची 25.21 लाख रुपये, 7-सीटर डिझेल ऑटोमॅटिकची 26.66 लाख रुपये, तर 6-सीटर डिझेल ऑटोमॅटिकची किंमत 26.76 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
ब्लॅक-थीम असलेल्या प्रीमियम एसयूव्ही पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठी टाटा मोटर्सचे हे नवीन स्टेल्थ एडिशन आकर्षक पर्याय ठरू शकते. दमदार लूक, प्रीमियम फीचर्स, शक्तिशाली पेट्रोल आणि डिझेल इंजिन तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय यामुळे हॅरिअर आणि सफारी स्टेल्थ एडिशन भारतीय एसयूव्ही बाजारात चांगली स्पर्धा निर्माण करण्याची शक्यता आहे.