
क्लासिक लेजेंड्स या कंपनीने आपल्या येझडी ब्रँडची नवीन २०२६ व्हेरियंट सिरीज भारतात लाँच केली आहे. या लाँचिंगमधील सर्वात मोठा बदल म्हणजे कंपनीने ‘येझडी ॲडव्हेंचर’ या बाइकला पहिल्यांदाच ‘ट्युबलेस क्रॉस स्पोक व्हील्स’ दिले आहेत. याशिवाय येझडी रोडस्टर आणि स्क्रॅम्बलर या मॉडेल्समध्येही आकर्षक नवीन रंगांचे पर्याय सादर करण्यात आले आहेत. ओणम सणाचे औचित्य साधून केरळमधून या नवीन गाड्यांच्या राष्ट्रीय लाँचिंगला सुरुवात झाली असून, संपूर्ण भारतात सर्व गाड्यांचे बुकिंग सुरू झाले आहे.
नवीन येझडी ॲडव्हेंचर आणि किमती
येझडी ॲडव्हेंचर बाइक आता नवीन ‘यलो फाल्कन’ या आकर्षक ड्युअल-टोन रंगात सादर करण्यात आली आहे. ट्युबलेस स्पोक व्हील्ससह येणाऱ्या या यलो फाल्कन व्हेरियंटची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत २,३२,९६९ रुपये ठेवण्यात आली आहे, जी सामान्य स्पोक-व्हील व्हर्जनपेक्षा २०,००० रुपयांनी जास्त आहे. याशिवाय टॉर्नेडो ब्लॅक, ग्लॉस व्हाईट आणि नेबुला ब्लू या रंगांमध्येही ट्युबलेसचा पर्याय उपलब्ध केला असून त्यांची किंमत २,२९,९६९ रुपये आहे.
टोयोटाची नवव्या पिढीतील ‘ऑल-न्यू हाइलक्स’ भारतात लाँच; ३१.९९ लाख रुपयांपासून किंमत सुरू
रोडस्टर आणि स्क्रॅम्बलरचे नवीन अवतार
येझडी रोडस्टर आता नवीन ‘ग्रीन माम्बा’ या मॅट ग्रीन रंगात सादर करण्यात आली आहे, ज्यामध्ये ब्राऊन रंगाची सीट आणि कॉपर शेडचे डेकल्स मिळतात. तर येझडी स्क्रॅम्बलरला ‘ग्रे पँथर’ हा नवीन मेटॅलिक ग्रे रंग देण्यात आला आहे. या दोन्ही नवीन मॉडेल्सची एक्स-शोरूम किंमत २,०५,९६९ रुपये आहे.
इंजिन क्षमता आणि परफॉर्मन्स
येझडी ॲडव्हेंचरमध्ये ३३४ सीसीचे लिक्विड-कूल्ड Alpha2 इंजिन आहे, जे २९.२ bhp पॉवर आणि २९.९ Nm टॉर्क जनरेट करते. यात ट्रॅक्शन कंट्रोल आणि ३ ABS मोड (रोड, रेन, ऑफ-रोड) मिळतात. स्क्रॅम्बलरमध्ये ३३४ सीसीचे KATAR इंजिन असून ते २९.५ bhp पॉवर आणि ३० Nm टॉर्क देते, तसेच ही बाइक ३० किमी/लीटरचा मायलेज देते असा दावा करण्यात आला आहे. रोडस्टरमध्ये असिस्ट-अँड-स्लिपर क्लच आणि ६-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
मिनी कन्व्हर्टिबल ‘Stardust Edition’ 62.90 लाख रुपयांना लाँच! 204 hp ची पावर; पाहा काय आहेत फीचर्स
नेटवर्क विस्तार आणि वॉरंटी
केरळमधील ओणम सणापासून विक्रीचा श्रीगणेश करत कंपनीने तेथे २० नवीन टचपॉइंट्स सुरू केले आहेत. आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत देशभरात ७०० टचपॉइंट्स उभारण्याचे क्लासिक लेजेंड्सचे उद्दिष्ट आहे. २०२६ येझडी रेंजसोबत ‘ओनरशिप ॲश्युरन्स प्रोग्राम’ अंतर्गत ४ वर्षे किंवा ५०,००० किमीची स्टँडर्ड वॉरंटी दिली जात आहे, जी ६ वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते.