पुरस्कार म्हणजे आपल्या कामाचं इतरांनी केलेलं कौतुक. आपण जे क्षेत्र निवडलं ते का? आपल्याला या मार्गाने जायचंय किंवा या क्षेत्रात काम करायचं ते आपणच ठरवलं. ती जबाबदारी आपणच आपल्या खांद्यावर घेतली. मग, पुरस्कारानं अशी कोणती मोठी जबाबदारी येते? ही जबाबदारी घेतल्यानंतर त्यात सातत्य राहिलं. चिकाटी, मेहनत घेतली तर आपल्या कामाचं कौतुक म्हणून पुरस्कार मिळतात. थंडरबोल्ट एक परिवर्तन समुहाला ७ जानेवारी २०१७ ला पहिला पुरस्कार मिळाला त्यावेळचं माझं मनोगत. त्या मतावर मी आजही ठाम आहेच. विकासचं काम पाहिलं, त्याच्याबद्दल वाचलं तेव्हा हे मत अगदीच अनाठायी नाही हे पक्क झालं…
विकासच्या जीवनाचा प्रवास हा संघर्षमयी… जुन्नरच्या येणेरे गावात त्याचा जन्म झाला. आई अशिक्षित तर वडील व्यसनी.. भावकीने कुटुंबाला वाळीत टाकलेलं.. विकासला दोन मोठे भाऊ.. त्यामुळे एक मुलगी असावी असं आईला वाटायचं.. पण तिसऱ्या वेळेही मुलगाच झाला.. मुलगी व्हावी ही आईची इच्छा होती. आई त्याला मुलीसारखे वाढवू लागली. पाच वर्षाचा होईपर्यंत ही जडणघडण होत होती. घरकामात मदत करणं, भांडी घासणं, धुणी धुणं, स्वयंपाकास मदत करणं या छोट्या गोष्टींचा परिणाम देहबोलीवर होत होता. तो मोठा होत होता.. शरीराने तो मुलगाच.. पण, घडणावळच अशी घडली होती की बोलण्यात, वागण्यात, चालण्यात बायकी लकबी आपोआप अंगात उतरल्या. दोष त्याचा नव्हताच मुळी.
कसबसं शिक्षण चालू होतं.. सातवी झाला आणि वडिलांनी शिकून काय करणार म्हणत शिक्षण सोडण्याचा आग्रह धरला. मोठ्या भावांप्रमाणे त्यानंही मोलमजुरी करावी ही त्यांची इच्छा. इकडे आईने भावाला सांगितले. मामानेही शाळेत पाठवेन सांगितलं. पण त्याचा उद्देश होता तो विकासला घरकाम करायला लावणं. मामाच्या घरीही मग घरकाम सुरु झालं. तेथून काही दिवसांनी पुन्हा आपल्या घरी परत. छोटी-मोठी कामं, शेजमजुरी करुन शिक्षण घेऊ लागला. कलेची आवड होती. लहानपणी साडी घालून केलेल्या नृत्याचे गावाने कौतुक केले होते. तर, कॉलेजमध्ये मित्र चिडवू लागले. समाजाचा दृष्टिकोन नकारात्मक. तो बदलून टाकायचा तर वीक पॉइंटला पॉझिटिव्ह पॉइंट समजायचं.. हे गणित लक्षात ठेवत विविध स्पर्धांमध्ये भाग घेत बक्षिसं मिळवली. अशातच बारावी आली. शिक्षणाचा एक महत्वाचा टप्पा. पण हा टप्पा फेल गेला. शिक्षणाला आळा बसला.
कलावंताचं माहेरघर मुंबई आता खूणावू लागली होती. एके दिवशी घर सोडून मुंबईत अंधेरीला आईच्या मावशीकडे आला. तिच्यासोबत घरकाम करू लागला. घरगडी म्हणून काम करुन सात वर्षे झाली. किशोर वय संपलं होतं.. याच काळात प्रदीप भिडे, सुलभा देशपांडे, ए. के. हंगल यांचा सहवास लाभला. शिक्षणाचं महत्व कळू लागलं.. पुन्हा बारावी पास होण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. सात वेळेच्या अपयशानंतर अखेर बारावी पास झाला. डॉ. शशी गायकवाड यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठातून बी. ए. पूर्ण झालं. सुबल सरकार यांचे चिरंजीव सागर सरकार यांच्याकडे क्लासिकल डान्सचे शिक्षण घेतलं. सोबतच डी.टी.पी. कोर्स केला. आता घरकाम करणं बंद झालं होतं. विविध दैनिक, साप्ताहिकांसाठी कम्प्युटर ऑपरेटर, दूरदर्शनला कम्प्युटर ग्राफिक ऑपरेटर या नोकऱ्या करताना सोबत नृत्याचे कार्यक्रम सुरु होतेच. एकदा लावणी सम्राट गुरुवर्य प्रमोद कांदळकर यांच्यासोबत ‘बिन बायकांचा तमाशा’ या लावणी शोची प्रॅक्टिस सुरु होती. त्यावेळी दूरदर्शनचे डेप्युटी डायरेक्टर कमल तेजस/वानखेडे यांनी प्रामाणिकपणा पाहून पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली. मतिमंद/दिव्यांग विद्यार्थ्यासाठी लागणाऱ्या डीएड पदवीसाठी नाशिकला निशिगंधा वाड यांच्या मावशी रजनी लिमये यांच्याकडे पाठविले. पण, तीन महिन्यानंतर काही कारणांमुळे आर्थिक सहाय्य देण्याचं नाकारलं. या दरम्यान, मतिमंदत्व म्हणजे काय? या मुलांचं जगणं कसं असतं? याची माहिती झाली. काही मतिमंद मुलांशी ओळखही झाली. जिवंत असूनही जिवंत नसणं हे त्यांचं जगणं विकासच्या मनाला चिरून गेलं. या मुलांच्या जगण्यापुढे आपल्या आयुष्याचं दु:ख काहीच नाही, ही जाणीव झाली. आता कोणत्याही परिस्थितीत प्रशिक्षण पूर्ण करायचंच.. पण फी कशी भरणार हा प्रश्न होताच. त्यावरही उपाय सुचला. रात्री लावणीचे कार्यक्रम, विविध शाळा-कॉलेजमध्ये नृत्य बसवून देणं आणि दिवसा प्रशिक्षण असा दिनक्रम सुरु झाला. कठीण प्रसंगांना सामोरं जायचं हे बाळकडू तर लहानपणीच मिळाले होते. दु:खाची अनुभूती घेतलेला माणूस दुसऱ्याच्या दु:खाची तीव्रता समजू शकतो. त्यामुळेच जगण्याच्या सीमारेषेवर रेंगाळणाऱ्या निष्पाप बालकांसाठी काहीतरी केले पाहिजे, असं मनानं ठरवलं. प्रशिक्षण पूर्ण झालं होतं. सर्वशिक्षा अभियान अंतर्गत अहमदनगर येथे शिक्षकाची नोकरी पत्करली. विजय जाधव यांच्या समतोल संस्थेत काम करण्याचा अनुभव पुढे फारच मोलाचा ठरला. २००५ साली विकासचे लग्न झाले. अश्विनीचे शिक्षण एसएससी नापास. पण, सुखी संसारासाठी तिनंही शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती ही दहावीची परीक्षा ६ वेळा देऊन पास झाली. पुढे बारावी पहिल्या झटक्यात सोडवत तिनेही मतीमंद मुलांसाठीचे विशेष शिक्षण घेतलं. दोघेही मुंबईत एका उच्चभ्रू इंग्रजी माध्यमाच्या विशेष शाळेत नोकरी करू लागले. मात्र, त्या शाळेत श्रीमंत पालकांच्या मुलांनाच शिक्षण दिलं जात होतं. मनाचा हिय्या केला. ती नोकरी सोडली आणि गरीब, समाजापासून वंचित असलेल्या मतिमंद मुलांसाठी काम सुरू केलं.
मायानगरी मुंबईपेक्षा संस्थेची खरी गरज ग्रामीण भागात आहे हे ओळखून जुन्नर शहरात काम सुरू केलं. २०१२ च्या सर्वेनुसार अनेक दिव्यांग मतिमंद मुलांशी संपर्क झाला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अनेक मुलांकडे अपंगत्वाचा दाखला नाही. मग, घरोघरी जाऊन पालकांना मुलांचे दाखले काढून दिले. मुलांना एकत्रित केलं. त्यांना दैनंदिन कौशल्य शिकवण्यावर भर दिला. त्यामुळे मुलांमध्ये विशेष बदल घडून आल्याचं पालकांच्या लक्षात आलं. मुलांसाठी शाळा सुरू करण्याची मागणी सुरु झाली. आई वडीलांनंतर मतीमंद मुलांचे खूप हाल होतात हे या काळात अनुभवलं. म्हणून त्या मुलांसाठी शिवनेरीच्या पायथ्याशी एक छोटी खोली भाड्याने घेतली. दोन मुलांना घेऊन माय अॅक्टिव्हिटी सेंटर संचालित नंदनवन निवासी प्रकल्प २०१२ ला सुरू झालं. पण, २ वर्षांचे घरभाडं थकलं. मालकानं घर खाली करायला सांगितलं. अश्विनीने मंगळसुत्र गहाण ठेवले. भाड्याचे पैसे दिले. उरलेल्या पैशात खानापूर येथे कमी दरात भाड्याची जागा घेऊन प्रकल्प स्थलांतरित केला. संस्थेचे काम व मुलांचे हाल पाहून जुन्नरमधील रुपाली बोकरिया यांनी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर माळरानावर संस्थेला १० गुंठे जागा बक्षीसपत्र दिली. आता येथे २२ मतिमंद मुलं शिकत आहेत, तर १४ जणं निवासी शिक्षण घेत आहेत. मुलांसाठी येथे सहा प्रकल्प सुरु करण्यात आलेत.हे काम सुरू करण्याची तळमळ होती. मुलांची जबाबदारी घ्यायची होती म्हणूनच विकासने आपल्यावर परिश्रम घेण्यास सुरवात केली. स्वत:चं वागणं बोलणं पूर्णत: बदललं. एक कणखर, जिद्दी तरुण अशा प्रतिमेत परावर्तित झाला. वर मी जो उल्लेख केला तो यासाठीच की जे क्षेत्र आम्ही निवडलं आहे ती आम्ही आमची जबाबदारी म्हणून स्वीकारली आहे. कोणताही पुरस्कार मिळावा. कामाचं कौतुक जरुर व्हावं. पण, कुणी म्हणणार असेल की पुरस्कारानं जबाबदारी वाढते तर ते कदापी मान्य नाही. विकासलाही १३ पुरस्कार मिळालेत. ते त्याच्या कामाचं कौतुक म्हणूनच.. जबाबदारी घेतली होती ती विचारपूर्वक आणि ती पार पाडण्यासाठी निश्चयपुर्वक प्रयत्न करत आहेच. त्याच विकासचं काम अधिक जाणून घ्यायचं असेल तर निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरकपारीत विसावलेल्या नंदनवनाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी आणि जमलचं तर आर्थिक हातभारही लावावा…
घे पाखरा मार भरारी
नको पाहू फिरुनी माघारी
जरी अधुरी तुझी कहाणी
परी गात जा मंजुळ गाणी…..
– विद्या पवार
vidyampawar@gmail.com






