मनुष्याचे जीवन म्हणजे ऊन-पाऊसाचा खेळ. रोज नवी आव्हाने आपल्या समोर उभी राहतात. कधी कधी त्यातून अलगद बाहेर पडतो, तर कधी त्यात अडकून जातो. आज मनुष्याचे मन चिंतेने ग्रासलेले आहे. चिंता, भय, एकटेपणा… हे मनुष्याच्या जीवनाला लागलेली कीड आहे. यापासून मुक्त होणे खूप महत्वाचे आहे. चिंता करणे ही सुद्धा एक सवय आहे, जी आपण स्वतःला लावून घेतो.
सतत मनामध्ये कसली ना कसली चिंता ही सतावत असते. कधी आपल्या भविष्याची चिंता तर कधी इतरांच्या आयुष्याची काळजी करतच राहतो. अश्या सवयींना नष्ट करायचे असेल तर काही गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. जसे एखादे मोठे झाड तोडायचे असेल तर त्या उंच झाडाला शिड्या लावून आधी लहान फांद्या छाटल्या जातात, मग मोठ्या असे करीत झाडाचे वरचे टोक छाटले जाते. नंतर उरते ते फक्त मधले विशाल खोड. बघता बघता ते झाड असे अलगदपणे जमिनीवर आडवे होते की जणू त्याला वाढायला पन्नास वर्षे लागलीच नसावीत. जर फांद्या कापायच्या आधी जमिनीवरून खोड कापले तर पडता पडता त्याने आजूबाजूच्या झाडांनाही पाडले असते. झाड छाटून आधी जितके लहान बनवाल तितके काम सोपे होते.
आपल्या व्यक्तिमत्वात खोलवर रुजून दीर्घ काळात भरपूर फोफावलेल्या चिंतावृक्षालाही आधी शक्य तितके लहान केलेलेच उत्तम. म्हणजे आधी छोट्या काळज्या आणि त्यांच्याबद्दल बोलणे यांच्यावर घाव घालायचे. शक्यतो कोणाबरोबर काही शेअर करायचे असेल तर आपले सुख शेअर करा. दुःख जितके जास्त शेअर करू तितके ते वाढत जाईल.
उदा. आपल्या संभाषणातून चिंता व्यक्त करणारे शब्द गाळा, कमी करा. चिंतेतून त्या शब्दांचा जन्म झाला असला तरी ते शब्द देखील चिंता निर्माण करू शकतात. मनात चिंतेचा विचार डोकावताच तातडीने तो दूर सारून श्रद्धेचा विचार करा, श्रद्धामय शब्द उच्चारा. ‘मला काळजी वाटते की माझी ट्रेन चुकेल’, असा विचार येताच वेळेवर पोहचता येईल इतक्या लवकर घरून निघा. आपण जितके कमी चिंतातुर असू तितक्याच तत्परतेने आपण वेळेवर निघू शकतो. कारण स्वस्थ मन पद्धतशीरपणे सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करू शकते. तसेच गीतेचे सार आपल्याला चिंतामुक्त करते. त्यातील शब्द नेहमी आपण लक्षात ठेवावे “जे झाले ते चांगले झाले, जे होत आहे ते सुद्धा चांगले होत आहे आणि जे पुढे होईल ते सुद्धा चांगलेच होईल.” ही ओळ जरी लक्षात राहिली तरी मनात चालणाऱ्या चिंतातूर विचारांवर मात करू शकू.
अशा रीतीने लहानसहान चिंतेच्या फांद्या झाटल्या की आपण तिच्या मुख्य खोडावर घाव घालू शकतो. त्यानंतर आपल्या सुविकासित शक्तिद्वारे आपण मूलभूत चिंतेला, चिंता करण्याच्या आपल्या सवयीला कायमचे नष्ट करू शकतो. त्याचबरोबर आणखी एक सवय आपण स्वतःला लावावी ती म्हणजे दररोज सकाळी उठल्यावर अंथरूण सोडण्याआधी ‘माझा पूर्ण विश्वास आहे की ईश्वर माझा पाठीराखा आहे’ हे शब्द तीनदा म्हणावे. दिवसाचा आरंभ करतानाच मनाला श्रद्धेचे वळण लावावे आणि ते नेहमीच टिकून राहते.
आपले मन हा विचार स्वीकारतो की दिवसभरात ते माझ्या सगळ्या समस्या आणि अडचणींना श्रद्धेच्या बळावर दूर करणार आहे. दिवसाचा आरंभच सृजनशील सकारात्मक विचाराने करावा. कारण विश्वास ठेवणाऱ्या माणसाला कोणीच मागे ओढू शकत नाही. आणि जेव्हा सकाळचा पहिला विचार हा ईश्वरावरच्या दृढ विश्वासाने केला तर दिवसभरात येणाऱ्या अनेक समस्यांना तोंड देण्याची शक्ति सुद्धा तो आपल्याला देतो व आपल्यातील शक्तींचा विकास ही होतो.
चिंता या चिते समान असतात. त्या आपल्या मनाला सतत जाळत राहतात. आपल्या सुख आणि शांतीला ते जाळत राहतात. व मनाला अस्वस्थ करतात. म्हणून मनाला सकारात्मकतेचे वळण लागले की सर्व चिंता दूर होतील. ‘श्रद्धा आणि सबुरी’ हे मनात पक्क केलं तरी आपल्या जीवनातील समस्यांना कमी करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये येते. समस्या कमी तर चिंता सुद्धा आपोआप कमी होत जातील. हळूहळू चिंतेचे वृक्ष छोटे छोटे होऊन शेवटी ते समाप्त सुद्धा होईल. फक्त मनाला योग्य विचार करण्याचे वळण लागणे गरजेचे आहे.
नीता बेन
bkneetaa24@gmail.com






